कासवांचे तस्कर ठाण्यात जेरबंद ; दोन दिवसांची पोलीस कोठडी

ठाणे – कासवांची तस्करी करणाऱ्या दोघांना ठाणे वनविभागाच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून दोन कासव जप्त केले असून ही कारवाई गुरुवारी एका नामांकित मॉल परिसरात करण्यात आली. अटक केलेल्या तस्करांना ठाणे न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती वनविभागाने दिली. त्यांनी ते कासव कुठुन आणि कशासाठी आणले आणि ते कोणाला विकण्यासाठी आले होते याबाबत चौकशी सुरू असून यामध्ये आणखी कोणी आहे का याचाही शोध सुरू असल्याचे वनविभागाने सांगितले.
ठाणे शहरातील पश्चिम कडील एका नामांकित मॉल परीसरात वन्य पक्षी- प्राण्यांची तस्करीसाठी येणार असल्याची माहिती ठाणे वनक्षेत्रपाल नरेंद्र मुठे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या पथकाने सापळा रचून मुंबई पूर्व ग्रॅण्ट रोड येथील जय लक्ष्मण मकवाणा (३०) आणि अनिकेत मनोज पुनबिया उर्फ बाबा यांना चौकशीसाठी ताब्यात घेत त्यांच्याकडून दोन कासव जप्त केले. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. शुक्रवारी त्या दोघांना ठाणे न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची कोठडी सुनावली आहे. ही कारवाई वनक्षेत्रपाल मुठे यांच्यासह वनक्षेत्रपाल वन्यजीव घटक एस.डी.डगळे, वनपाल अशोक काटसकार, वनरक्षक संदीप मोरे,दत्तात्रय पवार या पथकासह ठाणे वाइल्ड लाइफ वेल्फेअर असोसिएशन यांनी केली. वन्यपक्षी/ प्राणी हे वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२चे अनुसूची १ मधील संरक्षित आहेत. त्यांची खरेदी व विक्री करणे, बाळगणे,पाळणे याला बंदी आहे. वन्यपक्षी किंवा प्राणी स्वतः जवळ बाळगणे हा कायद्याने गुन्हा आहे. अशा कृत्यामध्ये भाग घेऊ नये. तसेच वन्यजीव विषयक कोणतीही तक्रार असल्यास १९२६ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन वनविभागाने केले आहे. याप्रकरणी पुढील तपास वनक्षेत्रपाल मुठे करत आहेत

 857 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.