कोरोना योद्धांना ‘प्लॅनेट मराठीचा सलाम’ चौथ्या वर्धापन दिनी राबवला सामाजिक उपक्रम

मुंबई  – १३ मे २०१७ रोजी अक्षय्य तृतीयेच्या मंगलदिनी प्लॅनेट मराठी या पहिल्या मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मची मुहूर्तमेढ रोवण्यात आली आणि अवघ्या काही काळातच प्लॅनेट मराठीने उत्तुंग भरारी घेतली. त्याच्या यशाचा आलेख दरवर्षी उंचावत गेला. प्रेक्षकांना दर्जेदार आणि आशयपूर्ण कन्टेन्ट देण्यासाठी नेहमीच तत्पर असलेल्या प्लॅनेट मराठीने प्रेक्षकांसोबत असलेली बांधिलकी कायमच जपली आहे. त्यामुळेच आज प्लॅनेट मराठी आपला चौथा वर्धापन दिन साजरा करत आहे. प्लॅनेट मराठीला आजवर मिळालेले हे यश साजरे करण्याची ही योग्य वेळ नसल्याने ‘प्लॅनेट मराठी’च्या वतीने यंदाच्या वर्धापन दिनी एक उपक्रम राबवण्यात येणार आहे. आज अवघे जग कोरोनाशी लढत आहे. या लढ्यात सहभागी झालेल्या प्रत्येक योद्ध्याला ‘प्लॅनेट मराठीचा सलाम’. या कठीण काळात सेलिब्रिटीजपासून सामान्य नागरिकांनी केलेल्या अविरत कार्याची  ‘प्लॅनेट मराठीचा सलाम’मध्य दखल घेतली जाणार आहे. याची मूळ संकल्पना ‘प्लॅनेट मराठी’ सोशल मीडियाच्या एव्हीपी जयंती बामणे- वाघधरे यांची असून त्यांचा या उपक्रमात प्रमुख सहभाग असेल.

 कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. सर्वच देशांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तरीही हार न मानता आपले पोलीस, डॉक्टर्स, आरोग्य यंत्रणा, महानगरपालिका या समस्येला धीराने सामोरे जात आहेत. त्यांच्याच जोडीने आज अनेक जण या विळख्यात सापडलेल्यांना आपापल्या परीने वेगवेगळ्या माध्यमांतून मदतही करत आहेत. वैद्यकीय सेवा, अन्नधान्य वाटप, वाहतूक सेवा, रक्तदान अशा अनेक सेवांसह आर्थिक मदतही करत आहेत. या लढाईत मानसिकरित्या खचित झालेले, रुग्ण, त्यांचे नातेवाईक यांचे मनोधैर्य वाढवून त्यांना भावनिक आधार देण्याचे कामही काही योद्धा करत आहेत. या अशाच योद्धांना सन्मानित करण्यासाठी ‘प्लॅनेट मराठी’ हा उपक्रम राबवणार आहे.

आपल्या चार वर्षांच्या या यशस्वी प्रवासाबद्दल प्लॅनेट मराठीचे सीएमडी अक्षय बर्दापूरकर सांगतात, ”प्लॅनेट मराठीचा हा चार वर्षांचा प्रवास निश्चितच आनंददायी आणि अपेक्षित असाच आहे. आज चौथ्या वर्धापन दिनाचा आनंद नक्कीच आहे. मात्र सध्याची स्थिती ही आनंद व्यक्त करण्यासारखी नाही. त्यामुळेच समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत ‘प्लॅनेट मराठी’ने या काळात लढणाऱ्या योद्धांना ‘प्लॅनेट मराठीचा सलाम’ हा उपक्रम सुरु केला आहे. यात सेलिब्रिटीजसोबत सामान्यांनाही सन्मानित करण्यात येणार आहे. ज्यांनी या लढाईत विविध मार्गांनी मदतीचा हातभार लावला आहे आणि प्लॅनेट मराठीच्या यशाबद्दल बोलायचे तर ही फक्त सुरुवात आहे अजून यशाचा बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. प्रेक्षकांना दिलेले वचन पूर्ण करायचे आहे आणि त्यासाठी ‘प्लॅनेट मराठी’ नेहमीच प्रयत्नशील असेल.”

 282 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.