३१ मेपर्यंत नोंदणी करणाऱ्या घरेलू कामगारांना लाभ द्यावेत

भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांची मागणी

ठाणे – राज्य सरकारतर्फे लॉकडाऊन काळासाठी देण्यात येणारे लाभ येत्या ३१ मेपर्यंत नोंदणी करणाऱ्या घरेलू कामगारांना द्यावेत, अशी आग्रही मागणी भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. घरेलू कामगारांची बिकट आर्थिक स्थिती, अपुरे ज्ञान आदींचा सहानुभुतीने विचार करून नोंदणीसाठी वाढीव मुदत देऊन कामगारांना दिलासा द्यावा, असे वाघुले यांनी म्हटले आहे.
राज्य सरकारतर्फे घरेलू कामगार अधिनियमान्वये लाभार्थी म्हणून नोंद केलेल्या १८ ते ५९ वयोगटातील व्यक्तींना राज्य सरकारकडून विविध लाभ दिले जातात. विशेषत: अपघात झाल्यानंतर लाभार्थींना साह्य, मुलांच्या शिक्षणासाठी मदत, उपचारासाठी तरतूद, प्रसूतीसाठी मदत आदींबरोबरच मंडळाने निश्चित केलेले लाभ दिले जातात. तुटपुंजे उत्पन्न व हातावर पोट भरत असलेल्या हजारो घरेलू कामगारांना योजनेचा दिलासा मिळतो.
कोविड आपत्तीमुळे मार्च २०२० पासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यानंतर गेल्या वर्षभरात बहुतांशी घरेलू कामगार महिलांना रोजगार न मिळाल्यामुळे उपासमार होत आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने घरेलू कामगारांना मदत करण्याची आवश्यकता आहे, अशी  मागणी ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी केली आहे.
कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळात घरेलू कामगारांना देण्यात येणाऱ्या लाभासाठी राज्य सरकारने ३१ मार्च २०२१ ही मुदत ठेवली आहे. मात्र, घरेलू कामगारांची बिकट आर्थिक स्थिती, अपुरे ज्ञान, लॉकडाऊनमुळे गमावलेला रोजगार, कोरोना संसर्गाची भीती आदी मुद्द्यांचा विचार करता गेल्या वर्षभरात शेकडो महिला कामगारांना नोंदणी करता आली नाही. या परिस्थितीमुळे हजारो महिला नोंदणीपासून वंचित राहिल्या. या महिलांना दिलासा देण्यासाठी भाजपा व विश्वास सामाजिक संस्थेच्या वतीने पुढाकार घेऊन नोंदणी सुरू केली. मात्र, ठाण्यासह राज्यभरातील हजारो घरेलू कामगारांना लाभ देण्यासाठी ३१ मेपर्यंत नोंदणीची मुभा द्यावी, अशी मागणी नगरसेवक  वाघुले यांनी केली आहे. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, कामगार मंत्री हसन मुश्रिफ, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे यांनाही  वाघुले यांनी पत्र पाठवून घरेलू कामगारांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे.

 242 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.