रामनगर आणि हाजुरीतील नाल्यांची अवस्था अधिकच बिकट तत्काळ दुरुस्ती न केल्यास संघर्ष- शानू पठाण

ठाणे – गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण यांनी आज ठाणे शहरातील हाजुरी आणि रामनगर भागातील नालेसफाईची पाहणी केली. या पाहणीमध्ये नाल्यांची अवस्था बिकट असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. विशेष म्हणजे, रामनगर येथील नाल्यात सन 2017 मध्ये अजय झैलसिंग आठवाल हा तरुण वाहून गेला होता. त्याचे प्रेत तीन महिन्यानंतर उरण येथे सापडले होते. त्या नाल्याचेही व्यवस्थीत बांधकाम झालेले नाही. पालिका प्रशासन लोक मरण्याची वाट पहात आहे का, असा सवाल यावेळी विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी केला.
शानू पठाण यांनी आज ठामपाचे बांधकाम अभियंते रवींद्र शिंदे, मुख्य स्वच्छता निरीक्षक तडमवार आदी अधिकार्यांच्यासह ठाणे शहरातील मुख्य आठ नाल्यांच्या सफाईची पाहणी केली. यावेळी राष्ट्रवादीच्या महिलाध्यक्षा सुजाता घाग,  ठाणे शहर युवक अध्यक्ष विक्रांत खामकर आदी उपस्थित होते.
मागील आठवड्यामध्ये शानू पठाण यांनी ठाणे शहरातील आठ नाल्यांची पाहणी केल्यानंतर ठामपा प्रशासनाने नालेसफाईला सुरुवात केली आहे. वास्तविक पाहता, मे महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात नालेसफाई पूर्ण होणे अपेक्षित असतानाही नालेसफाईच्या कामांना आता सुरुवात केली असल्याने शानू  पठाण यांनी संताप व्यक्त केली आहे.
      यावेळी पठाण यांनी सांगितले की,  जर कचरा तसाच नाल्यांमधून असेल तर त्या पूर्ण सफाईचा अर्थ काय घ्यायचा? ठाणे महापालिकेची नालेसफाई केवळ कागदावरच झाली आहे. जर नालेसफाई झाली असेल तर कचरा टाकला कुठे, कधी आणि केव्हा असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. मात्र हे प्रश्न उपस्थित करूनही पालिका प्रशासन त्याचे उत्तर देऊ शकत नाही. आताची परिस्थिती पाहता, 10 टक्क्यांपेक्षा अधिक नालेसफाई झालेली नाही. मे महिन्याचा दुसरा आठवडा ओलांडला आहे. पावसाळा तोंडावर आलेला आहे, असे असतानाही नालेसफाई होत नसेल तर याची जबाबदारी कोणाची? त्याच त्याच ठेकेदारांना ठेके देऊन प्रशासन आपले उखळ पांढरे करुन घेत आहे. प्रशासन आणि ठेकेदारांची टक्केवारी ठरलेली आहे. त्यामुळेच नालेसफाई केवळ कागदावर दाखविली जात आहे. हाजुरीमध्ये दरवर्षी पूरस्थिती निर्माण होत असते. ही पूरस्थिती आटोक्यात आणण्यासाठी नालेसफाई किंवा नाल्यांची पुन:र्बांधणी आवश्यक आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. आगामी आठवडाभरात जर नालेसफाई पूर्ण न केल्यास आपण रस्त्यावर उतरु असा इशाराही त्यांनी दिला. 

 275 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.