कोरोनायोद्ध्या परिचारिकांचा महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते सन्मान

जागतिक परिचारिका दिनानिमित्त महापौरांची खास भेट

ठाणे – गेली दिड ते दोन वर्षे सतत अहोरात्र स्वत:चा जीव धोक्यात घालूनकोणतीही सुट्टी किंवा अधिकच्या पगाराची अपेक्षा न करता आरोग्ययंत्रणेतील अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या परिचारिका या कोरोना युद्धामध्ये सैनिकासारख्या लढत आहेत. त्यांची बहाद्दुरी, धाडस, मेहनत, जिद्द या सगळ्यातूनच आपण हळूहळू कोरोनावर विजय मिळवित आहोत. आज जागतिक परिचारिका दिनानिमित्त त्यांचे या धाडसाबद्दल कौतुक करण्यासाठी किंबहुना त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी महापौर नरेश म्हस्के यांनी ठाण्यातील लसीकरण केंद्रावर भेट देवून त्यांना प्रोत्साहन देत परिचारिका दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
परिचारिका या प्रत्येक रुग्णालयातील रुग्ण व डॉक्टर यांच्यातील महत्वाचा दुवा. सिस्टर असे आपण त्यांना सहज म्हणतो. या सिस्टर आपली सेवा प्रामाणिकपणे बजावत असतातच. पण गेल्या दीड वर्षापासून कोविड-१९ सारख्या महामारीच्या  काळात या सिस्टर महत्वाची भूमिका बजावत आहे. आपला जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. आपल्यापासून आपल्या कुटुंबियांना कोणताही त्रास होवू नये यासाठी प्रसंगी काही महिने घरापासून लांब राहून कोविड रुग्णांची सेवा करीत आहेत. रुग्णांची सेवा करता करता अनेक परिचारिका या कोविड बाधितही झाल्या, पण तरीही त्यातून बरे झाल्यानंतर मनात कोणतीही भीती न ठेवता पुन्हा आपल्या सेवेत रुजू होवून जोमाने रुग्णांची सेवा करीत आहेत.काही परिचारिकांनी आपले प्राणही गमावले. सध्या लसीकरण केंद्रावरही देखील लसीकरणातही त्या हिरीरीने सहभागी होवून नागरिकांना लसीकरण करीत आहेत. या परिचारिकांचे कौतुक करावे किंबहुना त्यांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी आज महापौर नरेश म्हस्के यांनी ठाण्यातील काही लसीकरण केंद्रावर भेट देवून प्रातिनिधीक स्वरुपात परिचारिकांचे कौतुक केले, तसेच या जागतिक परिचारिका दिनानिमित्त केक कापून आजचा दिवस त्यांच्यासाठी खास बनविला.ठाण्याचे प्रथम नागरिक महापौर नरेश म्हस्के यांच्या या खास भेटीबद्दल लसीकरण केंद्रावरील सर्व परिचारिकांनी त्यांचे आभार व्यक्त केले. तर कोरोनाचा खात्मा होईपर्यंत आम्ही धैर्याने लढू अशीही ग्वाही परिचारिकांनी दिली.

 324 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.