मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स टिम सह व्हिडियो कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून डॉ. श्रीकांत शिंदे यांची मागणी.
डोंबिवली – कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रातील वाढती कोरोना परिस्थिती लक्षात घेता मा. मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडियो कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेनेचे खासदार तसेच कोविड टास्क फोर्स टीम मधील डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी, डॉ. राहुल पंडित उपस्थित होते. राज्यातील कोरोना परिस्थिती आणि वैद्यकीय उपाययोजनांसंदर्भात आयोजित या बैठकीत कोरोना बाधित रूग्णांवरील उपचार तसेच कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठीच्या संदर्भात चर्चा करताना कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सध्या कोरोनासोबतच जीवघेण्या म्युकरमायकोसिस या फंगल इंफेक्शनाचा धोका वाढत असल्याचा मुद्दा मांडला.
ब्लॅक फंगस च्या संसर्गामुळे चेहऱ्याभोवतीच्या हाडांच्या पोकळी मध्ये म्युकरमायकोसिस या फंगल इंफेक्शन वाढत असून याचा परिणाम डोळे, मेंदु यावर होत आहे. कोरोना उपचारादरम्यान वापरण्यात येणाऱ्या स्टेरॉईडस सारख्या औषधांमुळे रुग्णाच्या शरीरात हा संसर्ग वाढत असून याचा सर्वात मोठा धोका अनियंत्रित मधुमेह आणि कोरोना वरील उपचारादरम्यानच्या औषधांच्या दुष्परिणाम (साईड इफेक्टस) मुळे रोग प्रतिकारक कमी असलेल्या रुग्णांना असल्याचे डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.
महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये म्युकरमायकोसिसचा संसर्ग अतिवेगाने वाढत असून वेळेत उपचार न केल्याने आपले डोळे गमवावे लागल्याच्या अनेक घटना घडत असल्याकडे डॉ. श्रीकांत शिंदे यांनी लक्ष वेधले. या संसर्गावर उपचारासाठी ॲफोटेरिसिन बी (Amphotericin b) या इंजेक्शन वापराने इलाज करता येतो. या निदानासाठी असलेले हे औषध खुप खार्चिक असून आज ज्याप्रमाणे कोरोनावर उपचारसाठी वापर होत असलेल्या रेमदेसिविर औषधाचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा भासत आहे तशीच परिस्थिती येत्या काळामध्ये ॲफोटेरिसिन बी साठी होऊ शकते, अशी चिंता डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केली.
भविष्यात म्युकरमायकोसिस या फंगल इंफेक्शनाचा धोका वेळीच ओळखून राज्यात त्याबाबत उपाय योजना करण्याचे गरजेचे असल्याचे सांगत डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रूग्णालयातील ऑक्सिजनची गरज आणि पुरवठा याच्या परिक्षणासाठी कोविड टास्क फोर्स कार्यरत आहे, त्याच धर्तीवर स्टेरॉईडस सारख्या औषधांच्या वापरासंदर्भात देखील टास्क फोर्स स्थापन करावा, असे मत डॉ. शिंदे यांनी मांडले. कोरोना उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या स्टेरॉईडस सारख्या औषधांमुळे रुग्णाच्या शरीरात हा संसर्ग वाढत असून यावर आळा घालण्यासाठी टास्क फोर्स मधील तज्ञ चिकित्सकांच्या माध्यमातून राज्यातील डॉक्टरांना लाईन ऑफ ट्रिटमेंटसंदर्भात मार्गदर्शन करण्यात येईल, तसेच कोरोनावरील उपचार पद्धतीत स्टेरॉईडस सारख्या औषधांचा वापरांबाबात ट्रिटमेंट प्रोटोकॉल्स आखण्याचे काम देखील हा टास्क फोर्स करेल, असे डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी अधोरेखित केले.
कोरोनातून बरे झालेल्या अनेकांना या फंगल इंफेक्शनचा सामना करावा लागत आहे आणि कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर हे खुपच मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. म्युकरमायकोसिस मुळे डोळ्यावर परिणाम होऊन अंधत्व येणे, डोळा गमावावा लागणे तसेच मेंदुपर्यंत संसर्ग वाढल्यास प्रसंगी जीव गमावण्यासारख्या गंभीर घटना घडत असून म्युकरमायकोसिसचा संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये प्रामुख्याने डोळ्यांशी संबंधित लक्षणे दिसत असून डोळ्यांना सूज येणे, लाल होणे, दृष्टी कमी होणे, सतत डोळ्यांतून पाणी येणे आदी लक्षणे आढळत आहेत. या संसर्गाचे वेळेत निदान व्हावे यासाठी सदर लक्षणे आढळल्यास नागरिकांनी तात्काळ कान, नाक, घसा तज्ञांकडून तपासणी करून घेणे अतिशय महत्वाचे आहे. यासाठी राज्य शासनाने नागरिकांमध्ये म्युकरमायकोसिस संबंधित लक्षणे, चाचण्या व तपासणी याकरिता जनजागृती करावी, असे देखील डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी बैठकीत सुचित केले.
720 total views, 1 views today