हवेतून ऑक्सिजन निर्मितीचे ३८ पीएसए प्रकल्प राज्यात कार्यान्वित

दिवसाला ५३ मेट्रीक टन ऑक्सिजनची निर्मिती – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई – ऑक्सिजनच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी राज्य शासनामार्फत प्रयत्न केले आहेत. राज्यात जिल्हा रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये, खासगी रुग्णालये या ठिकाणी हवेतून ऑक्सिजन शोषून तो रुग्णांना देणारी प्रणाली (पीएसए ) बसविण्यात येत आहे. आतापर्यंत सुमारे ३८ पीएसए प्लांट कार्यान्वित झाले असून त्याद्वारे दिवसाला सुमारे  ५३ मेट्रीक टन ऑक्सिजन निर्मिती होत आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करताना ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. १२५० मेट्रीक टन ऑक्सिजन राज्यात उत्पादीत असून त्याची मागणी १७५० मेट्रीक टन एवढी झाली आहे. ती भरून काढण्यासाठी अन्य राज्यांमधून ऑक्सिजन आणतानाच स्थानिक पातळीवरच ऑक्सिजन निर्मिती व्हावी साठी हवेतून ऑक्सिजन शोषून तो रुग्णांना देणाऱ्या तंत्रज्ञानाच्या आधारावर प्लांट सुरू करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत, असे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले.
ऑक्सिजनच्या बाबतीत राज्य स्वयंपूर्ण होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून आतापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत १५० पीएसए प्लांटसाठी ऑर्डर देण्यात आली आहे. राज्यात अशा प्रकारे ३५० प्लांट बसविण्याचे नियोजन असून त्याद्वारे ५०० मेट्रीक टन ऑक्सिजन निर्मितीचे उद्दिष्ट असल्याचे टोपे यांनी सांगितले.
राज्यात कार्यान्वित झालेले हे ३८ पीएसए प्रकल्प बुलढाणा, वाशीम, बीड, लोखंडी सावरगाव, हिंगोली, जालना,नांदेड, उस्मानाबाद, सिंधुदूर्ग, मुंबई, अलिबाग, रत्नागिरी, गोंदिया, अहमदनगर, शिरपूर, भुसावळ, नंदूरबार, शहादा, सातारा, पुणे, बुलढाणा, चिखली, खामगाव येथील जिल्हा रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय, खासगी रुग्णालय याठिकाणी उभारण्यात आले आहेत.
वाशिम, सातारा, हिंगोली, अहमदनगर,भंडारा, अलिबाग, रत्नागिरी, बुलढाणा, उस्मानाबाद आणि सिंधुदूर्ग येथील जिल्हा रुग्णालयांमध्ये केंद्र शासनाच्या मदतीने हवेतील ऑक्सिजन शोषून तो शुद्ध करून रुग्णांना पुरविणारे पीएसए प्लांट बसविण्यात आले आहेत. वैद्यकीय ऑक्सिजनच्या वाढत्या मागणीमुळे जाणवणाऱ्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर ह्या प्रकल्पातील ऑक्सिजनचा वापर हा रुग्णांसाठी वरदान ठरणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले

 366 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.