मनोज शिंदे यांचा धक्कादायक आरोप, लसीकरणातही शिवसेनेकडून गोंधळ
ठाणे – ठाण्यासह जिल्ह्यात रेमडेसिवचा तुटवडा निर्माण झालेला आहे. आजही रुग्णालयांना मागणीपेक्षा कमी प्रमाणात रेमडेसिवर उपलब्ध होत आहेत. परंतु असे असतांना शिवसेनेच्या शाखेतून रेमडेसिवरचा पुरवठा केला जात असल्याचा धक्कादायक आरोप कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मनोज शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे केवळ शिवसेनेच्या शाखेतून त्याचा पुरवठा करण्यापेक्षा सर्व पक्षीय कार्यालयातून याचा साठा उपलब्ध करुन दिल्यास गरजू रुग्णांचा त्या उपलब्ध होऊन त्यांचे प्राण वाचण्यास मदत होणार आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यात लक्ष घालून सर्व पक्षांच्या कार्यालयात त्या उपलब्ध करुन देण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.
ठाण्यात आज अनेक खाजगी रुग्णालयातील रुग्णांना रेमडेसिवर या इंजेक्शनची गरज भासत आहे. पंरतु खाजगी रुग्णालयांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडे त्याची मागणी केल्यानंतर उपलब्ध साठय़ातून रुग्णालयांना त्या उपलब्ध होत आहेत. एकीकडे रेमडेसिवरचा तुटवडा असल्याचे दिसत असले तरी शिवसेनेच्या शाखांमधून रेमडेसिवर उपलब्ध होत असून त्यांच्याकडे कसा साठा उपलब्ध होत आहे, असा सवालही शिंदे यांनी केला आहे. त्याताही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना किंवा त्यांच्या नातेवाईकांनाच ते उपलब्ध करुन दिले जात असल्याचा आरोपही शिंदे यांनी केला आहे. शिवसेनेकडून अशा प्रकारे भेदभाव करणे अयोग्य असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळेच एकनाथ शिंदे यांना मी या माध्यमातून विनंती करतो की त्यांनी इतर पक्षांच्या कार्यालयांना देखील रेमडेसिवर उपलब्ध करुन द्यावेत जेणे करुन अनेक रुग्णांचे प्राण वाचविण्यास मदत होणार आहे. त्यानुसार तत्काळ पावले उचलावीत अशी मागणीही त्यांनी केली आहे.
सध्या लसीकरणावरुन देखील गोंधळ अनेक केंद्रावर सुरु आहे. त्या त्या भागातील वर्चस्व असलेला पक्ष लसीकरणसाठी नोंदणी करुन गेलेल्या नागरीकांना लस न देता, दुसऱ्यांनाच लस देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यातून लसीकरणाचा काळा बाजार सुरु असल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे. त्याठिकाणी प्रशासनाची प्रशासनाची यंत्रणा कामाला लावल्यास सर्वाना योग्य पध्दतीने लस उपलब्ध होऊ शकते असेही त्यांनी सांगितले आहे. मुंबई किंवा इतर महापालिकांच्या ठिकाणी रुग्ण मृत्युमुखी होत असताना त्याठिकाणी स्मशानभुमीत लाकडांसाठी पैसे आकारले जात नाही. परंतु ठाणे महापालिकेच्या माध्यमातून त्यासाठी पैसे आकारले जात आहेत. आधीच नागरीकांची परिस्थिती कोरोनामुळे मेटाकुटीला आलेली आहे. त्यामुळे एखाद्याचा मृत्यु झाल्यानंतर त्यासाठी महापौरांनी यात लक्ष घालून लाकडे मोफत उपलब्ध करुन द्यावेत अशी मागणीही शिंदे यांनी केली आहे.आपला पक्ष वाढविण्याची ही ती वेळ नाही
कोरोनाच्या महामारीला महाविकास आघाडी सरकार सामोरे जात आहे, त्यामुळे सर्व पक्षीयांना विनंती राहिली की, या माध्यमातून आपला पक्ष वाढविण्याची, किंवा मतदार वाढविण्याची ही ती वेळ नाही. तर सर्व नागरीकांच्या मदतीला जाणो, त्यांना काय हवे काय नको, यासाठी प्रयत्न करमे, त्यांचे प्राण कसे वाचतील, या संकटातून आपण कसे बाहेर येऊ यासाठी देखील प्रयत्न करणो ही सध्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.रेमडेसिवरचा आणि लसीकरणाचा सावळा गोंधळ सुरु आहे. रेमडेसिवरचे इंजेक्शन केवळ शिवसेनेच्याच शाखेत मिळत आहे. तर लसीकरणाचाही सावळा गोंधळ मागील काही दिवसापासून सुरु आहे. त्यामुळे हा सुरु असलेला सावळा गोंधळ दूर करावा आणि ठाणेकरांना न्याय द्यावा हिच विनंती एकनाथ शिंदे यांना आहे.
(मनोज शिंदे – प्रदेश सरचिटणीस, कॉंग्रेस)
562 total views, 1 views today