सुधा भारद्वाज यांचा योग्य वैद्यकीय औषधोपचार करावा – आमदार विनोद निकोले भीमा कोरेगाव प्रकरणी मोकाट फिरणाऱ्या खऱ्या आरोपींना पकडा

डहाणू. भीमा कोरेगाव प्रकरणी तुरुंगात असलेल्या देशातील महत्त्वाच्या मानवाधिकार कार्यकर्त्या आणि मान्यवर वकील श्रीमती सुधा भारद्वाज यांना तातडीने योग्य वैद्यकीय औषधोपचार करावे असे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या कडे ईमेल द्वारे निवेदन पाठवून मागणी केली आहे.

यावेळी आमदार कॉ. निकोले म्हणाले की, देशातील महत्त्वाच्या मानवाधिकार कार्यकर्त्या आणि मान्यवर वकील श्रीमती सुधा भारद्वाज या एन.आय.ए. तपास करत असलेल्या भीमा कोरेगाव प्रकरणी भायखळा तुरुंगात अडीच वर्षाहून अधिक काळ आहेत. त्यांचे वय साठीच्या वर असून त्यांना काही व्याधी आहेत. त्यांना तुरुंगात नव्याने काही व्याधी जडल्या असून त्यांना अतिसार, थकवा आणि तोंडाची गेलेली चव ही लक्षणे दिसू लागली आहेत. त्यांनी जे. जे. रुग्णालयात तपासणी आणि उपचारासाठी अर्ज केला, परंतु त्याला प्रशासनाने काहीच प्रतिसाद दिलेला नाही. त्यांची प्रकृती गंभीर होत असून त्यांना तातडीने योग्य ते औषधोपचार उपलब्ध करून दिले पाहिजेत. यासाठी महाराष्ट्र शासनाने त्वरित लक्ष घालून त्यांना एखाद्या सुसज्ज रुग्णालयात हलवून त्यांच्यावर तज्ञ डॉक्टरांकडून उपचार सुरू करावेत, असे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू विधानसभा कॉम्रेड विनोद निकोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या कडे ईमेल द्वारे निवेदन पाठवून मागणी केली आहे.

तसेच आ. निकोले म्हणाले की, भीमा कोरेगाव प्रकरणातील खरे आरोपी मोकाटपणे फिरत आहेत. त्यांना पोलीस पकडत नाहीत, आणि ज्यांचा त्या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही अशांची जाणीवपूर्वक चौकशी केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर करण्यात आहे. हे अजिबात योग्य नसून खऱ्या आरोपींना पकडून त्यांची चौकशी व्हावी.

 388 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.