रस्ता रूंदीकरणाच्या नावाखाली गोरगरिबांना बेघर करण्यास जबाबदार कोण?

विरोधी पक्षनेते शानू पठाण यांचा सवाल

ठाणे : बड्या बिल्डर्ससाठी निर्मनुष्य भागात कोट्यावधी रूपये खर्च करून रस्ते बांधले जात आहेत. रस्ता रूंदीकरणाच्या नावाखाली   मागील आयुक्तांच्या कार्यकाळात मुंब्रा, कौसा, दिवा आदी भागात अनेक गोरगरिबांना विस्थापित करण्यात आले. मात्र रस्ता रूंदीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले नाही. त्यामुळे गोरगरीब जनतेला विस्थापित करण्यास मागील की आताचे आयुक्त जबाबदार आहेत का?  असा संतप्त सवाल विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण यांनी स्थायी समितीच्या बैठकीत उपस्थित केला.
ठामपाच्या स्थायी समितीची बैठक आज पार पडली. या बैठकीमध्ये रस्त्यांच्या कामांवर चर्चा झाली. त्यावेळी शानू पठाण यांनी आक्रमक भूमिका घेऊन ही रखडलेली कामे तत्काळ मार्गी लावण्याची  मागणी केली.
मुंब्रा ते दिवा मुख्य रस्ता, कौसा , खर्डी आदी भागात रस्ता रूंदीकरण करण्यासाठी अनेक घरे, दुकाने जमीनदोस्त करण्यात आली होती. मागील आयुक्तांच्या कार्यकाळात ही कारवाई करण्यात आली होती. मात्र विद्यमान आयुक्तांच्या कार्यकाळातही हे काम पूर्ण करण्यात आले नाही. यास जबाबदार कोण? एकीकडे बड्या बिल्डर्सचे  नवीन प्रकल्प येण्यापूर्वीच तिथे रस्ते बांधण्यासाठी पालिकेचे अधिकारी पायघड्या टाकत आहेत. मात्र, गोरगरिबांना बेघर केल्यानंतरही रस्ते बांधले जात नाहीत. हा प्रकार काय आहे. गरीबांकडून फायदा नसल्याने हे रस्ते केले जात नाहीत. अशा स्थितीत एका रात्रीत दुकानदारांना भिकेकंगाल करण्यास जबाबदार कोण आहेत?  याची माहिती जाहीर करावी, अशी मागणी शानू पठाण यांनी केली.
दरम्यान,  रस्ता रूंदीकरणाच्या आड येणार्या जलवाहिन्या स्थलांतरीत करण्यात येणार होत्या. त्यासाठी आर्थिक तरतूदही करण्यात आलेली आहे. मात्र, ठेकेदारांनी हे कामही पूर्ण केलेलं नाही. त्यामुळे या कामाचा ठेका ज्या ठेकेदारांना  देण्यात आलेले आहे.  त्यांच्यावर कारवाई करावी, अशी सूचनाही पठाण यांनी यावेळी केली. अनेक ठिकाणी नालेसफाई रखडलेली आहे. पावसाळ्याला  अवघे दोन महिने राहिले आहेत.  तरीही नालेसफाईच्या कामाला वेग आलेला नाही. ही सफाई न झाल्याने  शहरात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.  या पुरामध्ये गोरगरिबांचा संसार उद्ध्वस्त होत असतो. याची काळजी प्रशासनाला आहे की नाही? असा सवाल करीत नालेसफाई वेगवान पद्धतीने करावी, अशीही मागणी शानू पठाण यांनी केली.  
शुक्रवारी स्थायी समितीचा दौरा
शानू पठाण यांनी रस्त्यांच्या कामासंदर्भात आक्रमक धोरण अंगीकारल्यानंतर स्थायी समिती सभापती संजय भोईर यांनी शुक्रवारी या भागाचा दौरा प्रस्तावित केला आहे. या दौर्यात सदर अर्धवट कामांची चौकशी करून संबधित अधिकार्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

 503 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.