दिव्यांग राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत कल्याणच्या रविंद्र संतेची चमकदार कामगिरी

महाराष्ट्र संघाने जिंकली दिव्यांग टी १० क्रिकेट स्पर्धा

कल्याण : नोएडामधील सेक्टर २१ ए येथील स्टेडियममध्ये झालेल्या दिव्यांगांच्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघाने दिव्यांग टी १० क्रिकेट स्पर्धा जिंकली. या स्पर्धेत कल्याण तालुक्यातील रविंद्र संते या खेळाडूने चमकदार कामगिरी करत संपूर्ण सामन्यात उत्कृष्ट खेळाडूचा किताब पटकावला आहे.
कर्नाटक फिजिकली चॅलेंज्ड असोसिएशनच्यावतीने आयोजित केलेल्या दिव्यांग टी १० क्रिकेट स्पर्धेची अंतिम लढत बिहार आणि महाराष्ट्र या दोन संघामध्ये झाली. यामध्ये बिहार संघाने नाणेफेक जिंकून १० षटकात ७३ धावा उभारल्या. असितसिंग याने सर्वाधिक २६ आणि पंकज कुमारने १० धावा केल्या. महाराष्ट्र संघाकडून विक्रांत केणी याने दोन, तसेच रवी पाटील, रविंद्र संते आणि कल्पेश पाटील यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
रवींद्र संतेच्या २४ चेंडूतील ५६ धावांच्या झटपट खेळीच्या बळावर महाराष्ट्र संघाने ७.२ षटकात १ बाद ७९ धावा करीत जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. विक्रांत केणी याने नाबाद १७ धावांचे योगदान दिले. महाराष्ट्र संघाचा एकमेव फलंदाज असितसिंग याने बाद केला. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते महाराष्ट्र संघाला आकर्षक करंडक प्रदान करण्यात आला. अंतिम सामन्यात रविंद्र संते सामनावीर ठरला. त्याला स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणूनही गौरविण्यात आले. 

 140 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *