‘धर्मराज्य पक्षा’ची ठाण्यातील पेट्रोल पंपाच्या मालकांकडे मागणी
ठाणे : पेट्रोल पंपावर येणाऱ्या वाहनधारकांसाठी, सुस्थितीतील स्वच्छतागृहे उपलब्ध करुन देण्याची मागणीवजा विनंती एका लेखी पत्राद्वारे ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने ठाण्यातील पेट्रोल पंपांच्या मालकांना नुकतीच करण्यात आली आहे. वाहनधारक पंपावर इंधन भरत असताना, त्यांच्याकडून पेट्रोलच्या प्रति लिटरमागे ९ पैसे, तर डिझेलमागे ६ पैसे अतिरिक्त पैसे घेतले जातात. या माध्यमातून दरमहा सुमारे १२ ते १५ हजारांची रक्कम जमा होत असते. या समाविष्ट पैशांचा वापर पेट्रोल पंपांवरील स्वच्छतागृहांची देखभाल करण्यासाठी केला जाणे गरजेचे असतानाही, ठाण्यातील बहुतांश पेट्रोल पंपांवरील स्वच्छतागृहांची दुरवस्था झालेली असल्याचे ‘धर्मराज्य पक्षा’च्या निदर्शनास आलेले आहे. पेट्रोल पंपावर येणाऱ्या प्रत्येक वाहनधारकास (महिला/पुरुष) त्या-त्या ठिकाणची स्वच्छतागृहे वापरण्याचा पूर्ण अधिकार असूनही, त्याकडे निष्काळजीपणे दुर्लक्ष केले जाते. संतापजनक बाब म्हणजे, बऱ्याचदा पेट्रोल पंपावरील स्वच्छतागृहांना कुलूप लावलेले असते. याठिकाणी वाहनधारकांना जाण्यास मज्जाव केला जातो. ही बाब आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत गंभीर असून, याप्रकरणी पेट्रोल पंपांच्या मालकांनी काळजीपूर्वक लक्ष घालून, प्रत्येक लिटरमागे घेतल्या जाणाऱ्या अतिरिक्त रकमेचा विनियोग फक्त स्वच्छतागृहांच्या (टॉयलेट व बाथरूम) देखभालीसाठी व त्याद्वारे वाहनधारकांच्या वापरासाठी करावा, तसेच स्वच्छतागृहांची पाटी वाहनधारकांना स्पष्टपणे दिसेल व वाचता येईल, अशापद्धतीने मोठ्या अक्षरांत लावण्यात यावी, अशा आशयाची मागणीवजा विनंती ‘धर्मराज्य पक्षा’चे युवा संघटक अजय जया यांनी एका लेखी पत्राद्वारे ठाण्यातील सर्व पेट्रोल पंप मालकांना केली असून, सदर मागणीची तात्काळ दखल घेण्यात यावी, अन्यथा पुढील दहा दिवसांत वाहनधारकांसाठी (महिला/पुरुष) संबंधित पेट्रोल पंपावरील स्वच्छतागृहे उपलब्ध करुन दिली नाहीत, तर आम्हाला ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने सनदशीरमार्गाने व कायदेशीररित्या योग्य त्या ठिकाणी दाद मागावी लागेल, असा इशारादेखील अजय जया यांनी पत्राच्या शेवटी दिला आहे.
450 total views, 1 views today