एमपीएससी परिक्षांबाबत तुघलकी निर्णय

आमदार निरंजन डावखरे यांची प्रतिक्रिया

ठाणे : एमपीएससी परिक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय तुघलकी आहे, अशी प्रतिक्रिया कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपाचे आमदार निरंजन वसंत डावखरे यांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर नियोजित वेळापत्रकाप्रमाणेच येत्या १४ मार्च रोजीच परिक्षा घेण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
कोविड आपत्तीच्या काळात यापूर्वी एमपीएससीच्या परिक्षा पाच वेळा ढकलण्यात आल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले होते. आता १४ मार्च रोजी होणाऱ्या एमपीएससीच्या राज्य सेवा पूर्व परिक्षांसाठी विद्यार्थ्यांची तयारी पूर्ण झाली आहे. अशा परिस्थितीत परिक्षेला तीन दिवस राहिले असतानाच, आज अचानक दुपारी एमपीएससी परिक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय विद्यार्थ्यांसाठी तुघलकी आहे. त्यातून राज्यातील पाच ते सहा लाख विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे, असे आमदार निरंजन डावखरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
एकिकडे राज्य सरकारकडून `माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ असे वारंवार म्हटले जाते. मात्र, एमपीएससी परिक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडले जात आहे. तरी आपण तातडीने हा निर्णय रद्द करून १४ मार्च रोजीच परिक्षा घेण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी आमदार डावखरे यांनी केली आहे.

 346 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.