पुराच्या प्रवाहात सर्वकाही वाहून गेलेल्या कुटुंबियांना प्रती दोन ब्लॅकेट, दोन सांसारिक भांड्यांचे सेट, कढई, साड्या, थंडीसाठी थर्मलसेट, सोलार दिवे, मुलांना कपडे व गरजेच्या वस्तूंचे केले वाटप.
ठाणे : उत्तराखंडमधील नैसर्गिक आपत्तीग्रस्त चमोली जिह्यात श्री माँ ट्रस्ट, श्री तारा माँ मिशन, श्री ओंकारानंद ट्रस्ट द्वारा मदत कार्य करण्यात आले. यात शालेय-कॉलेज विद्यार्थ्यांची पूर्ण वर्षाची हजारो रुपये फी भरणा करण्यात आली, स्त्रियांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून गृहोद्योगाला चालना देण्यात आली, निराश्रीत मुलींना दत्तक घेण्यात आले तसेच विस्थापितांना गरजेच्या वस्तूंचे वाटप अशी अनेक कामे करण्यात आली.
उत्तराखंडातील चमोली जिल्हा, तपोवन, जोशी मठ परिसरात हिम प्रलयामुळे नद्यांचे पाणी वाढले. नद्यांना महापूर आला. त्यात नदी किनाऱयाजवळील लहान वसाहती, गांवे प्रचंड पाण्याच्या झोताने वाहून गेले. घरे-दारे, प्राणहानीचा अंदाज करणेच कठीण आहे. ठिकठिकाणी पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली होती. होत्याचे नव्हते झाले. या संकट समयी ठाणे, पुणे, हरीद्वार येथील श्री माँ आश्रमाच्या संस्थापक दिव्य श्री तारा माँ यांच्या श्री तारा माँ मिशन आणि श्री ओंकारानंद ट्रस्ट तर्फे चमोली जिह्यात मदतीचे कार्यतत्परतेने सुरु करण्यात आले आहे. श्री माँ ग्रुप ऑफ इन्स्टीट्यूशनचे चेअरमन व विश्वस्त बालगोपाल यांनी मदतीच्या स्थानांची माहिती संपादन केली. त्यानंतर कार्यकर्त्यांसह श्री माँ या वयातही खचलेले रस्ते, डोंगर-टेकड्या ओलांडीत चमोली जिह्यातील तपोवन पंचायत, रैणी, धक, खारछोन, रिंगी, कुंदीखोला, पल्ला-वल्ला, सुबाई, भविष्यबद्री येथे पोहोचल्या. सोबत विश्वस्त बालगोपाल, मंजू तेजवानी होत्या
तपोवन परिसरातील २७ उध्वस्त झालेल्या कुटुंबांना आर्थिक सहाय्याचा आधार
त्या परिसरातील ९ गावांमधील २७ दुर्दैवी कुटुंबातील कर्ते पुरुष हरपले होते. त्यांच्या घरोघरी जाऊन श्री माँ यांनी विस्थापित कुटुंबांचे सांत्वन करून मनशांतीसाठी धीर दिला. तसेच प्रत्येक कुटुंबियांना मदतीचा धनादेश दिला. ज्या स्त्रियांवर घराची जबाबदारी पडली आहे त्यांना गृह उद्योग करण्याची प्रेरणा देऊन मदत केली. त्यांना व्यवसाय शिक्षणाची साद घालीत शेतात काम व कुटीरोद्योगात कामासाठी आवाहन केले.
त्या कुटुंबांतील शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या २०२१/२०२२ शालेय वर्षातील एकूण फी रु. ६०,६०० तसेच शासकीय इंटर कॉलेजच्या विद्यार्थ्यांची फी रु. २०००० श्री माँ यांनी त्या त्या संस्थेत भरणा केली. फी अभावी घरी बसणारी मुले पुन शिक्षणाच्या प्रवाहात आली आहेत.
पुराच्या प्रवाहात सर्वकाही वाहून गेलेल्या कुटुंबियांना प्रती दोन ब्लॅकेट, दोन सांसारिक भांड्यांचे सेट, कढई, साड्या, थंडीसाठी थर्मलसेट, सोलार दिवे, मुलांना कपडे व गरजेच्या वस्तूंचे वाटप केले. या कुटुंबांशिवाय इतरांना १२० ब्लँकेट व १२० सोलार कंदील ४० थर्मल आणि कपडे वाटप केले.
हरिद्वार येथे गरीब मुलींच्या मोफत शिक्षणासाठी श्री माँ यांनी हिंदी माध्यमातील कन्या विद्यालय आणि इंग्लीश माध्यम, सी.बी.एस.ई. सेकंडरी स्कूलची स्थापना करून १२ वी पर्यंत शिक्षण पूर्ण करण्याची सोय उपलब्ध करून दिलेली आहे. दत्तक घेतलेल्या मुलींची अन्न, वस्त्र, घर, शिक्षणाची जबाबदारी मोठ्या उदात्तपणे श्री ओंकारानंद ट्रस्ट तर्फे श्री माँ सांभाळीत आहेत. ज्या घरात निराश्रीत मुली आहेत, त्यांना दत्तक घेण्याचा प्रस्ताव संकटग्रस्त कुटुंब आणि एस.डी.एम. यांना देण्यात आलेला असून त्या मुलींच्या शिक्षणाची सर्वांगीण जबाबदारी श्री तारा माँ मिशनने स्वीकारली आहे.
विश्वस्त स्वामी बालगोपाल यांनी रैणी या पूरग्रस्त भागाला कार्यकर्त्यांसह भेट दिली. ऋषीगंगापुराने येथील पूल वाहून गेलेला आहे. या परिसरातील २०५ लोक बेपत्ता झाले असून बाजूचे लाता, रैणी, सुराईथोरा, सूतीया भागात नैसर्गिक आपत्तीने सारेच जीवन उध्वस्त झालेले आहे. कार्यकर्त्यांच्या मदतीने बालगोपाल यांनी या परिसरातील संकटग्रस्त ३०० कुटुंबांना ब्लँकेट,भांडी, कपडे आणि गरजेच्या वस्तूंचे घरोघरी वाटप केले. श्री तारा माँ यांचे हे मानवतावादी उदात्त कार्य अखंड सुरु आहे त्यास पूर्णविराम नाही.
460 total views, 1 views today