महाराष्ट्र कबड्डी संघाची उपकर्णधार मंदा परब (सुप्रिया कदम) काळाच्या पडद्याआड

सलग सहा वर्षे केले राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व

मुंबई : नवयुग क्रीडा मंडळाची सलग ६ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा खेळलेली मंदा परब (सुप्रिया कदम) यांचे हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने वयाच्या ७४व्या वर्षी निधन झाले. मार्च महिन्याच्या ८ तारखेला त्या पंच्याहत्तरी गाठणार होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा प्रसाद, मुलगी, सून, जावई व नातवंडे असा परिवार आहे. तब्बेत अत्यावस्थ झाल्यामुळे त्याना आदल्या दिवशी सायंकाळी रुग्णालयात दाखल केले होते.पण दुसऱ्या दिवशी सकाळी ७-१५ च्या सुमारास त्यांचे निधन झाले. मुलुंड येथील टाटा कॉलनी हिंदू स्मशानभूमीत मुलगा प्रसाद यांनी त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार केले.
महिलांत पहिल्या शिवछत्रपती पुरस्काराच्या प्राप्त चित्रा नाबर-केरकर यांना कबड्डी क्षेत्रात आणण्याचा मान त्यांना जातो. परब यांनी चित्रा यांना शाळेत खेळताना पाहिले आणि भाई काळूष्टे यांना सांगून तिला घरच्यांच्या परवानगीने नवयुग क्रीडा मंडळात खेळावयास आणले. मंदा परब यांनी १९६१-६२ अमृतसर, १९६२-६३ जबलपूर, १९६३-६४ कोल्हापूर, १९६४-६५ दिल्ली, १९६५-६६ हैदराबाद, १९६६-६७ इंदोर अशा सलग सहा राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. तर इंदोर येथील स्पर्धेत त्या महाराष्ट्राच्या उपसंघनायिका होत्या. १९७०-७१ साली त्या महाराष्ट्राच्या प्रशिक्षिका होत्या. पायाच्या अंगठयावर निदान रेषा ओलांडणाऱ्या त्या पहिल्या महिला खेळाडू होत्या. पाठलाग करून व बैठी लाथ मारून गडी टिपण्यात त्यांचा हातखंडा होता. डावा मध्यरक्षक असलेल्या परब किरकोळ व बारीक शरीरयष्ठीच्या असून चपळ होत्या. २०१९ साली त्यांच्या या खेळाचे महत्व ओळखून “ओम् कबड्डी प्रबोधिनीच्या” वतीने त्यांना “जेष्ठ महिला खेळाडू” म्हणून गौरव केला होता.
“ त्यांचा मनमिळावू व प्रोत्साहित करणाऱ्या स्वभावामुळेच मी शिवछत्रपती पुरस्कारा पर्यंत पोहचू शकले.” अशा शब्दात चित्रा नाबर यांनी त्यांना आदरांजली व्यक्त केली. मंदा परब यांच्या सारख्या जिद्दी व लढवय्ये खेळाडू आजच्या काळात असत्या, तर महाराष्ट्राची होणारी पिछेहाट आज झाली नसती. अशा शब्दात महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सचिव आस्वाद पाटील यांनी त्यांच्या खेळाचे महत्व विशद केले.

 414 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.