टीएमटी उपव्यवस्थापकांना निलंबित न केल्यास मंगळवारी धरणे आंदोलन


परिवहन समिती सदस्य शमीम खान यांनी शुक्रवारी सभापती विलास जोशी यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी ठाणे परिवहन सेवेचा बोजवारा उडाला आहे. त्यास टीएमटीचे अधिकारीच जबाबदार असल्याचा आरोप केला.

ठाणे :  परिवहन सेवेवर प्रचंड खर्च करुनही गेल्या दहा वर्षात ही सेवा तोट्यातच चालली आहे. परिवहन उपव्यवस्थापक दिलीप कानडे हे केवळ खुर्ची उबवण्याचे काम करीत आहेत. सदस्यांनी दिलेल्या पत्राला कानडे हे केराची टोपली दाखवित आहेत. त्यामुळे त्यांना तत्काळ निलंबीत करावे; अन्यथा, मंगळवारी गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार परिवहन मुख्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा परिवहन सदस्य शमीम खान यांनी दिला.
परिवहन समिती सदस्य शमीम खान यांनी शुक्रवारी सभापती विलास जोशी यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी ठाणे परिवहन सेवेचा बोजवारा उडाला आहे. त्यास टीएमटीचे अधिकारीच जबाबदार असल्याचा आरोप केला.
शमीम खान यांनी सांगितले की, परिवहन सेवेत कार्यरत असलेले अधिकारी केवळ भ्रष्टाचारामध्ये अडकले आहेत. त्यांच्यामुळेच परिवहन सेवा तोट्यामध्ये चालत आहे. अशा अधिकार्‍यांमुळे परिवहन सेवा आणि परिवहन समिती बदनाम होत आहे. जर, असे अधिकारी सेवेत राहिले तर पुढील सहा वर्षे परिवहन सेवा फायद्यात येणार नाही. त्यामुळे परिवहन सेवेचे उपव्यवस्थापक दिलीप कानडे यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे; जर निलंबित करण्यात अडचणी असतील तर त्यांची बदली करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली. ही मागणी मान्य न झाल्यास  मंगळवारी परिवहन कार्यालयाच्या दारात नितीन पाटील, मोहसीन शेख, प्रकाश पाटील यांच्यासह धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही दिला.
मुंब्रा येथून कोकणात एसटी बस सोडण्यासाठी प्रयत्न
मुंब्रा-कौसा भागात कोकणातील अनेक लोक वास्तव्यास आहेत. या लोकांना कोकणात जाण्यासाठी वाहनांची सुविधा नाही. त्यामुळे मुंब्रा येथून एसटी बससेवा सुरु करण्यासाठी टीएमटी सभापतींनी प्रयत्न करावेत, अशी विनंती मुंब्रावासियांनी केली. त्यावर परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी लवकरच बैठक घेऊन हा प्रश्न निकाली लावू. मुंब्रा ते खेड अशी बससेवा सुरु करु, असे आश्वासन सभापती विलास जोशी यांनी दिले.

 458 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.