कोविड आपत्तीत पैशांची उधळपट्टी न करता शिवसेनेने लोकाभिमुख कामे करावीत

भाजपाच्या नगरसेवकांची महासभेत मागणी

ठाणे : कोविड आपत्तीत जनतेच्या पैशांची उधळपट्टी न करता शिवसेनेने लोकाभिमुख कामे करावीत, अशी आग्रही मागणी भाजपाच्या नगरसेवकांकडून आजच्या महासभेत करण्यात आली. तसेच लोकहिताच्या प्रश्नांवर महापालिकेतील सत्ताधारी व प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
महापालिकेच्या वेबिनार महासभेत भाजपाच्या वतीने नवनियुक्त गटनेते मनोहर डुंबरे व मावळते गटनेते संजय वाघुले यांच्यासह ज्येष्ठ नगरसेवक मिलिंद पाटणकर, नारायण पवार, मुकेश मोकाशी, मृणाल पेंडसे, सुनेश जोशी, कृष्णा पाटील, अर्चना मणेरा, नम्रता कोळी यांनी आक्रमकपणे विविध मुद्दे मांडून प्रशासनाचे लक्ष वेधले.
मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना भरपाईची मागणी
कोविडमुळे मृत्युमुखी पडलेल्या महापालिकेतील ३१ कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपयांची भरपाई व अनुकंपा तत्वावर कुटुंबातील एका सदस्याला नोकरी द्यावी, अशी मागणी भाजपाच्या वतीने करण्यात आली.
दिव्यातील बेकायदा बांधकामांना विरोध
दिवा परिसरातील वाढत्या बेकायदा बांधकामांना सत्ताधारी शिवसेना व महापालिका प्रशासनातील काही अधिकाऱ्यांचे पाठबळ आहे. या बांधकामांना भाजपाचा तीव्र विरोध असून, दोषी राजकिय नेते व अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी भाजपाच्या नगरसेवकांनी केली.
घंटागाडी प्रकल्पात उधळपट्टी
कोपरी-नौपाडा-उथळसर भागात घंटागाडीद्वारे कचरा उचलण्यासाठीचा २६ कोटींचा प्रस्ताव हा केवळ कंत्राटदाराच्या फायद्यासाठी आणण्यात आला आहे. या प्रस्तावानुसार कंत्राटदाराकडून ३० टाटा ७०९ एलटी वाहने भाड्याने घेतली जातील. एका वाहनाची बाजारभावानुसार किंमत ९ लाख ४० हजार रुपये असून, महापालिका केवळ भाड्यापोटी तीन वर्षांत ३० लाख रुपये कंत्राटदाराला देणार आहे. त्याचबरोबर कार्यालयीन व अनुषंगिक खर्च जादा दाखवून ठाणे महापालिकेच्या तिजोरीची तब्बल ८ ते १० कोटी रुपयांची लूट केली जाणार आहे. कोविड आपत्तीनंतर उत्पन्नावर मर्यादा आली असताना काटकसरीची गरज आहे. त्यामुळे या प्रस्तावातील किमान १० कोटी रुपये कमी करावेत, अशी आग्रही मागणी भाजपाच्या वतीने करण्यात आली.
कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जितो ट्रस्टचा घाट का?
ठाणे शहरात कॅन्सर हॉस्पिटल उभारण्यासाठी भाजपाचा पाठिंबा आहे. मात्र, टाटा कॅन्सर हॉस्पिटल स्वतंत्रपणे हॉस्पिटल चालविण्यासाठी सक्षम असताना जितो ट्रस्टला का जोडले जात आहे. यापूर्वी विनानिविदा पद्धतीने विशेष कोविड हॉस्पिटल, हाजुरी येथील इमारत आणि शाळा जितो ट्रस्टला दिल्या गेल्या. सातत्याने जितो ट्रस्टचा घाट का घातला जात आहे, असा सवाल भाजपाने केला. या जागेवर ग्लोबल इम्पॅक्ट हब उभारण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. तो ठराव अचानक रद्द का करण्यात आला. सदर ग्लोबल इम्पॅक्ट हबचे भवितव्य काय, याचा खुलासा करावा, अशी मागणीही भाजपाच्या वतीने करण्यात आली.

 492 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.