कामगारांच्याआंदोलनाला पाठिंबा म्हणून आज मोहने बंदची हाक देण्यात आली होती. या बंद मध्ये दुकानदार, रिक्षा चालक यांनी आपली दुकानं आणि रिक्षा बंद ठेवून पाठिंबा दिला.
कल्याण : मोहने येथील एन.आर.सी कामगारांचा प्रश्न शासन दरबारी पोहोचवा याकरिता कामगार व महिलावर्ग ठिय्या आंदोलना बरोबर रास्ता रोकोचा प्रयत्न करीत असतानाच गेल्या पाच दिवसांपासून कामगारांनी बेमुदत धरणे आंदोलनास सुरुवात केली आहे. कामगारांच्या या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आज मोहने बंदची हाक देण्यात आली होती. या बंद मध्ये दुकानदार, रिक्षा चालक यांनी आपली दुकानं आणि रिक्षा बंद ठेवून पाठिंबा दिला.
एन.आर.सी कारखाना बारा वर्षापासून बंद पडला असून थकित रक्कम व्यवस्थापन तुटपुंज्या स्वरूपात देत असल्याने कामगारांनी ती रक्कम घेण्यास विरोध केला आहे. एन.आर.सी कडे असलेली साडे चारशे एकर जमीन अदानी उद्योग समूहाला विकली असल्याने याची मोठी रक्कम एन.आर.सी व्यवस्थापनाला देण्यात आली आहे. अदानी समूहाने मध्यंतरी कामगारांना अकरा हजार रकमेची ऑफर देऊन आकर्षित करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र कामगार वर्गाने याकडे सपशेल पाठ फिरवली होती.
कामगार वसाहतीत रिकाम्या खोल्या बंगले इमारती तोडण्याचे काम सुरू करण्यात आले असून कामगार या तोडक कारवाईला ही विरोध करीत असून गेल्या महिन्यात कारवाईला विरोध केल्याने कामगार नेत्यांवर खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे देखील दाखल करण्यात आले होते. एकीकडे मोर्चा आंदोलनाची हत्यार उपसत आज पंचक्रोशीतील अटाळी, वडवली, शहाड, मोहने, आंबिवली मोहीली, मानिवली, उंभर्णी, मांडा टिटवाळा, सांगोडे, वाडेघर, कल्याण आदी ठिकाणी राहत असणाऱ्या कामगारांनी बेमुदत साखळी उपोषणास प्रारंभ केला आहे. राज्य शासनाने कामगारांच्या न्याय हक्काकडे लक्ष वेधून घेण्यासाठी प्रचंड संख्येने कामगार वर्ग धरणे आंदोलनात उतरला आहे. कामगारांच्या या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी आज मोहने बंदची हाक देण्यात आली होती. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले.
499 total views, 2 views today