केडीएमटीच्या ताफ्यात दाखल होणार ४ तेजस्विनी बसेस, बस खरेदीच्या करारवर स्वाक्षऱ्या; महिलावर्गाला मिळणार दिलासा
कल्याण : महिलावर्गाचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर व्हावा यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने महिलांसाठी ४ तेजस्विनी बस घेण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. आज या बस खरेदीच्या करारावर परिवहन समिती सभापती मनोज चौधरी आणि परिवहन व्यवस्थापक मिलिंद धाट यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या असून महिलांसाठीच्या या तेजस्विनी बसेसचा मार्ग मोकळा झाला आहे. यावेळी परिवहन समिती सदस्य आणि इतर अधिकारीवर्ग उपस्थित होते.
कार्यालयीन आणि गर्दीच्या वेळेत महिला प्रवाशांना होणारा त्रास टाळण्यासाठी केडीएमटीने तेजस्विनी बस सेवा अंतर्भूत केल्या आहेत. कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम, डोंबिवली पूर्व, डोंबिवली पश्चिम या मार्गांवर सकाळी ७ ते ११ आणि सायंकाळी ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत ४ बस धावणार आहेत. यामध्ये केवळ महिलांना प्रवासाची मुभा असल्याने यामुळे महिला प्रवाशांना सुसह्य प्रवास करणे शक्य होईल. तर इतर वेळेस सर्व प्रवाशांना यातून प्रवास करता येणार आहे.
सन २०१७ मध्ये शासनाने ४ मिडी बसेस केडीएमटी उपक्रमास मंजूर केल्या. डिसेंबर २०१७ मध्ये परिवहन समिती आणि सर्व साधारण सभेने या बसेस खरेदीसाठी मंजुरी दिली. या बसेस खरेदी करण्यासाठी शासनाने १ कोटी २० लाखांचा निधी मंजूर केला आहे. या बसेसच्या खरेदीसाठी निविदा प्रक्रिया करण्यात आली होती. मात्र ४ वर्षे होऊनही या निविदेस प्रतिसाद मिळत नव्हता. परिवहन समिती सभापती मनोज चौधरी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर या बसेससाठी त्यांनी पाठपुरावा करून पुन्हा निविदा प्रक्रिया राबवली. या निविदेस प्रतिसाद मिळाला असून या ४ मिनी बसेस खरेदी करण्याच्या करारावर आज स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी या तेजस्विनी बस असून महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं या बसची रचना करण्यात आली आहे. या बसमध्ये वाहन चालक आणि वाहक जरी पुरूष असला तरी वाहक मात्र महिला असणार आहे. तसंच महिलांच्या सुरक्षेसाठी बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा, जीपीएस प्रणाली तसंच पॅनिक बटन देखील असणार आहे. तर येत्या काही दिवसात या बसेस महिला प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असल्याची माहिती परिवहन समिती सभापती मनोज चौधरी यांनी दिली.
504 total views, 1 views today