अमित समर्थ यांची ‘राईड अ‍ॅक्रॉस इंडिया’ सायकल मोहीम

१५ फेब्रुवारीला झाला प्रारंभ; १४ दिवसात सहा हजार किमीचा संकल्प

नागपूर : प्रसिद्ध अल्ट्रा सायकलपटू डॉ. अमित समर्थ यांनी ‘राइड अ‍ॅक्रॉस इंडिया ’ मोहिमेंतर्गत तब्बल सहा हजार किमी सायकल प्रवास करण्याचा संकल्प केला आहे. १५ फेब्रुवारीला मुंबईतून या मोहिमेला सुरुवात झाली असून जवळपास ८५ शहरांना या मोहिमेद्वारे समर्थ भेट देतील. ही संपूर्ण मोहिम १४ दिवसांत पूर्ण करण्याचे समर्थ यांनी निश्चित केले आहे.  ‘या मोहिमेचे चित्रकरण होणार असून ते गिनिज रेकॉर्डसाठीही पाठविले जाईल,’ असे आयोजकांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
रेस अ‍ॅक्रॉस अमेरिका तसेच ‘ट्रान्स सायबेरियन एक्स्ट्रीम’ या जगातील अत्यंत कठीण आणि खडतर रेस पूर्ण करणारे आशियातील एकमेव सायकलपटू असा मान असलेले समर्थ हे  ‘स्कॉट स्पोर्ट्स इंडिया’चे ब्रँड अ‍ॅम्बेसिडर आहेत. आपल्या नव्या मोहिमेची माहिती देताना ते म्हणाले, ‘मुंबईस्थित गेट वे ऑफ इंडिया येथून सुरू होणारी ही मोहीम द. भारतातील चेन्नईसह अनेक शहरातून पुढे कोलकाताकडे सरकेल. त्यानंतर बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि पुन्हा परत मुंबईत येणार आहे. दररोज कमीतकमी विश्रांती आणि अधिकाधिक सायकल प्रवास असा क्रम असे. दररोज किमान ४५० किमी सायकल चालविण्याचे लक्ष्य आखण्यात आले आहे. द. भारतातील उकाडा आणि उत्तर भारतातील कडाक्याची थंडी असा अनुभव यानिमित्त येईल.’
या प्रवासात निधी उभारण्यासाठी आवाहन करण्यात येईल. हा निधी डॉ. प्रकाश आमटे यांच्या हेमलकसास्थित लोकबिरादरी प्रकल्पाला दान दिला जाणार आहे. आदिवासी आणि दुर्गम भागातील खेळाडूंच्या उत्थानासाठी निधीचा उपयोग होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ही पहिलीच मोहीम
देशाच्या अनेक शहरांना वळसा घालणारा सहा हजार किमी सायकल प्रवास हा पहिलाच प्रयत्न असल्याचा दावा समर्थ यांनी केला. या प्रवासाची उपग्रहाच्या माध्यमातून तंतोतंत माहिती मिळू शकेल. यासाठी विशेष वेबसाईट तयार करण्यात आली आहे. समर्थ यांच्या हृदयाची गती, शारीरिक क्षमता, हवामान, ऑक्सिजनचे प्रमाण आदींची माहिती ठेवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रांचा वापर होणार आहे. त्यांच्यासोबत जी टीम असेल त्यात संचालक जितेंद्र नायक, विविट वाळवे, आनंद फिसके, मुकुल समर्थ, राज महाडिक, आरुषी नायक, रवींद्र परांजपे, अश्विन मोकाशी, भावेश पात्रे, दिलीप वरकड, डॉ. सुधीर बलडोटा,मनीष भाटी, रिशी सहगल, सचिन शिरभवीकर, शीतल कोल्हे, डॉ. श्रीहास बर्दापूरकर,अरहम शेख, अनिरुद्ध पांडे, मिलिंद परिवकम आदींचा समावेश असेल. या मोहिमेसाठी रोटरी क्लब आॅफ नागपूर डाउनटाउनसह देशभरातील रोटरी क्लबचे , तसेच सुमती पांडुरंग देव ट्रस्टचे सहकार्य लाभले आहे.
पत्रकार परिषदेला शब्बीर शाकिर, जितेंद्र नायक, निखिल सुतारिया, आनंद फिसके, मुकुल समर्थ, रितू जैन, निशिकांत काशीकर आदींची उपस्थिती होती.

 460 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.