शहराध्यक्षांनी दिले पालिका आयुक्तांसह गृहमंत्र्यांनाही पत्र
ठाणे : ठामपाच्या कर्मचार्याला धमकावणारे स्थावर मालमत्ता विभागाचे अधीक्षक तथा दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या अडचणींमध्ये अधिकच वाढ झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहाराध्यक्ष माजी खासदार आनंद परांजपे यांनीही पालिका आयुक्त, गृहमंत्री, पोलीस आयुक्त यांना निवेदन देऊन महेश आहेर यांची चौकशी करावी; त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली आहे.
माजी खासदार आनंद परांजपे यांनी दिलेल्या निवेदनामध्ये महेश आहेर यांच्या शैक्षणिक पात्रता, बीएसयूपीच्या घरांचा घोटाळा, अनधिकृत बांधकामे, त्यांची संपत्ती, अतिरिक्त पोलीस संरक्षण आदी सर्वच प्रकारांची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी केली आहे. माजी खासदार परांजपे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, महेश आहेर हे दहावी उत्तीर्ण अन् अकरावी नापास आहेत. त्यांनी विनायका मिशन, सिक्कीम येथून बनावट पदवी घेतली आहे. त्यामुळे त्यांची पदनियुक्तीच बेकायदा आहे, असे नमूद करुन त्यांना पदमुक्त करावे, अशी मागणी केली आहे. त्याशिवाय, दिवा प्रभाग समितीमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरु असून या बांधकामांना आहेर यांचेच अभय आहे; बीएयूपीच्या बोगस लाभार्थी गुन्हा प्रकरणात हस्ताक्षर तज्ज्ञांकडून महेश आहेर यांच्या सहीची तपासणी न झाल्याने हा घोटाळाही त्यांनीच केला आहे; अॅक्मे, एमएमआरडीए येथील अनेक घरे आणि गाळे बेकायदेशीरपणे भाडेतत्वावर देण्यात आलेली आहेत. या प्रकरणात स्थावर मालमत्ता विभागातील एका लिपीकाला लाच लुचपत प्रतिबंधक खात्याने अटक केली होती. स्थावर मालमत्ता अधीक्षकांच्या मर्जीशिवाय हे कृत्य होण्याची शक्यता अगदीच धूसर आहे. त्यामुळे अशी घरे बेकायदेशीरपणे भाडेतत्वावर देण्यामध्ये महेश आहेर यांचा मोठा सहभाग असू शकतो; महेश आहेर हे सध्या दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त आणि स्थावर मालमत्ता विभागाचे अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. वास्तविक पाहता, त्यांचा सेवाकाळ पाहता ते जास्तीत जास्त अ वर्ग लिपीक होऊ शकतात. अशा स्थितीमध्ये त्यांना देण्यात आलेले पोलीस संरक्षणही संशयास्पद आहे. त्यांना पोलीस तसेच खासगी बाऊंन्सरचे संरक्षण आहे. हे संरक्षण देण्यामागील कारणे काय, याचा काहीही थांगपत्ता नाही. मधल्या काळात त्यांना परदेशातून धमकीचा फोन आला असल्याचा गवगवा करण्यात आला होता. हा फोन का, कोणी आणि कुठून केला होता, याचीही चौकशी करण्याची गरज आहे; महेश आहेर यांनी ठाणे तसेच शिळफाटा येथे असलेल्या दोस्ती रेंटलमधील घरांचे आणि गाळ्यांचे वाटप करताना मोठा गैरव्यवहार केला आहे, असे आरोप करुन महेश आहेर यांची लाचलुचपत प्रतिबंधक खात्यामार्फत चौकशी करावी, त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आनंद परांजपे यांनी केली आहे.
512 total views, 2 views today