कल्याण येथील स्टारसिटी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक कॅथलॅबचे उद्घाटन

ठाकुर्ली डोंबिवली कल्याण अंबरनाथ येथील नागरिकांना अ‍ॅन्जिओग्राफी, अ‍ॅन्जिओप्लास्टीच्या  व हृदयविकारासंबंधीत विविध शस्त्रक्रियांची सुविधा निर्माण झाली आहे.

  ठाणे : कल्याण पूर्व येथील स्टारसिटी  मल्टिस्पेशालिटी  हॉस्पिटलमध्ये परदेशी अद्ययावत कॅथलॅबची सुविधा असलेला सुसज्ज आणि परिपूर्ण असा कार्डिओलॉजी (हृदयरोग शस्त्र विभाग) विभाग सुरू करण्यात आला असून  महाराष्ट्र स्टेट  केमिस्ट अँड डिस्टिब्युटर्स अलायन्स लिमिटेडचे अध्यक्ष  जगन्नाथ शिंदे, आमदार गणपत गायकवाड, स्थानिक नगरसेवक नवीन अनंत गवळी, आयएमए अध्यक्ष प्रशांत पाटील,  यांच्या हस्ते तसेच स्टारसिटी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. प्रवीण भुजबळ, डॉ. प्रदीप शेलार, डॉ. भावेश चौहान, डॉ. उमेश कापूसकर, डॉ. राजेश पास्तारिया, डॉ. चंदन सिंग, डॉ. चंद्रकांत शिवशरण, हृदयविकारतज्ज्ञ डॉ. पंकज कासार, डॉ. पंकज पाटील, डॉ. सचिन चौधरी  यांच्या उपस्थितीत अत्याधुनिक मशिनरींची सुविधा असलेल्या कॅथलॅबचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले.त्यामुळे आता  ठाकुर्ली डोंबिवली कल्याण अंबरनाथ येथील नागरिकांना अ‍ॅन्जिओग्राफी, अ‍ॅन्जिओप्लास्टीच्या  व हृदयविकारासंबंधीत विविध शस्त्रक्रियांची सुविधा निर्माण झाली आहे. याविषयी अधिक माहिती देताना स्टारसिटी  मल्टिस्पेशालिटी  हॉस्पिटलचे हृदयशल्यविशारद डॉ. पंकज कासार म्हणाले, ‘‘ भारतात हृदयविकारामुळे मृत्यू होणाऱ्या रूग्णांचा आकडा सर्वांधिक आहे. दिवसेंदिवस हृदयविकाराचा झटका येणाऱ्या रूग्णांची संख्याही वाढतेय. हा हृदयविकार होण्याची अनेक कारणं जवळपास सर्वांनाच माहिती असली तरीहि आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. आजच्या धकाधकीच्या, स्पर्धात्मक, यांत्रिक युगात मानसिक ताण तणावाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे तरुण पिढीमध्ये उच्च रक्तदाब , मधुमेहाचे  प्रमाण वाढत चालले आहे. तरुण वयाच्या मुलामुलींना हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण भारतात वाढतं आहे. उच्च रक्तदाब वेळीच नियंत्रणात आणला नाही तर अशा व्यक्तींना पुढे हृदयविकार किंवा इतर दुष्परिणाम होऊ शकतात.विविध देशांमध्ये केलेल्या सर्वेक्षणात असे दिसून येते की एकंदर लोकसंख्येच्या १० ते २५ टक्के लोकांमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण आढळते.  मात्र योग्य आहार-विहार, विचार, व्यायाम, नियमित तपासणी, चाचण्या, उपलब्ध उपचार या सर्व गोष्टी हृदयाघात टाळू शकतात.स्टारसिटी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आता अत्याधुनिक  कॅथ लॅब विभाग सुरु झाल्यामुळे  हृदयविकार असलेल्या नागरिकांना एक चांगला पर्याय निर्माण झाला आहे आमच्या हॉस्पिटलमध्ये हृदयरोगतज्ज्ञ डॉक्टर्स तसेच तंत्रज्ञ व भूलतज्ज्ञ २४ तास अहोरात्र सेवा देणार आहेत.”अमेरिकेत प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनपर लेखानुसार २०१५ पर्यंतच्या आकडेवारीनुसार भारतात ६.२  कोटी लोकांना हृदयाशी संबंधित आजार आहे. यापैकी २. ३ कोटी माणसांचं वय ४० पेक्षा कमी आहे. म्हणजेच ४० टक्के हृदयविकाराशी संबंधित रुग्णांनी वयाची चाळिशीही पार केलेली नाही. भारतीयांसाठी हे आकडे धोक्याची घंटा आहेत. गेल्या पाच वर्षांत ही आकडेवारी नक्कीच वाढलेली आहे , अशी माहिती हृदयशल्यविशारद डॉ. पंकज कासार यांनी दिली.

 614 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.