उसरघर जिल्हा परिषद शाळेची उपक्रमशील शाळा म्हणून निवड

कोरोना काळात प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना अध्यापन करणे शक्य नसल्याने या शाळेतील शिक्षकांनी विविध उपक्रम राबवून शाळा बंद पण शिक्षण चालू हा उपक्रम यशस्वीपणे राबविला होता.

कल्याण :  कल्याण तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उसरघर या शाळेची उपक्रमशील शाळा म्हणून कल्याण तालुक्यातून प्रथम क्रमांकाने निवड करण्यात आली आहे. कोरोना काळात प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना अध्यापन करणे शक्य नसल्याने या शाळेतील शिक्षकांनी विविध उपक्रम राबवून शाळा बंद पण शिक्षण चालू हा उपक्रम यशस्वीपणे राबविला होता.
कोरोना काळात मार्च महिन्यापासून शाळा बंद झाल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण कसे होईल असा प्रश्न पालक विद्यार्थी व शिक्षकांना पडला होता. यावर काहीही करून विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये असा निश्चय शाळेचे मुख्याध्यापक राहूल परदेशी आणि शिक्षिका मानसी खंबायत यांनी केला. या निश्चयानुसार विद्यार्थ्यांकडे उपलब्ध इलेक्ट्रॉनिक साधनांची यादी बनविण्यात आली. आणि त्यानुसार त्यांना उपलब्ध साहित्यानुसार शैक्षणिक साहित्य कसे वापरण्यास देता येईल याचा आराखडा तयार केला.
लॅपटॉप असलेल्या विद्यार्थ्यांना डीव्हीडी आणि पेनड्राईव्हच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्य देण्यात आले. ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहे त्यांना विविध व्हिडीओ व लिंक पाठवून शैक्षणिक साहित्य देण्यात आले. विद्यार्थ्यांना दूरदर्शनवरील टिली मिली या कार्यक्रमाचे वेळापत्रक देण्यात आले. व्हिडीओ कॉल करून विद्यार्थ्यांना त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला गेला. ज्यांच्याकडे इलेक्टॉनिक साधने नाहीत त्यांच्यासाठी लोकसहभागातून स्वाध्यायपुस्तिका मिळवून त्यांचे घरोघरी वाटप करण्यात आले. तसेच त्यांची जबाबदारी वरच्या वर्गातील मुलांना देऊन त्यांचे शिक्षण बंद होणार नाही याची पूरेपूर काळजी घेण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत वेळोवेळी आढावा घेण्यात आला. कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या पालकांना धान्य वाटप करतानाच विद्यार्थ्यांच्या अभ्यासाबाबत पालकांशी चर्चा करून त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. शाळेच्या या विविध उपक्रमांची दखल घेऊन शाळेची उपक्रमशील शाळा म्हणून निवड करण्यात आली. या निवडीसाठी गटशिक्षणाधिकारी एम.एम. पाटील, विस्तार अधिकारी प्रेरणा नेवगी, केंद्रप्रमुख पंडित आचरेकर, विषयतज्ञ राम शिरोळे यांचे मार्गदर्शन लाभल्याचे मुख्याध्यापक राहूल परदेशी यांनी सांगितले.

 488 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.