वस्तू सेवा कराच्या मुद्द्यावरून कॅटचा २६ फेब्रुवारीला भारत बंद

बंदला समर्थन म्हणून ऐटवाही करणार वाहतूकीचा चक्का जाम

मुंबई : वस्तू सेवा कराच्या सद्य स्वरुपाच्या निषेधार्थ कॉनफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) २६फेब्रुवारीला भारत बंदची घोषणा केली आहे. य बंदला पाठिंबा देताना वाहतुकदारांची पालक संघटना असलेल्या ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट वेल्फेयर असोसिएशननेही (ऐटवा)देशभरात चक्का जाम करण्याचे जाहीर केले असल्याचे कॅटचे महाराष्ट्र उपाध्यक्ष आणि ठाणे जिल्हा होलसेल व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुरेशभाई ठक्कर यांनी सांगितले.
देशातील सुमारे २००हुन अधिक व्यापाऱ्यांचा सहभाग असलेल्या कॅटच्या तीन दिवसीय राष्ट्रीय व्यापार संमेलनाला आजपासून नागपूर येथे सुरुवात झाली. या संमेलनात कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी सी भरतिया, राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल आणि ऐटवाचे अध्यक्ष प्रदीप सिंघल यांच्या उपस्थितीत सर्व व्यापाऱ्यांनी एकत्रितपणे भारत बंदचा निर्णय घेतला. वस्तू सेवा कर परिषदेने स्वतःच्या फायद्यासाठी वस्तू सेवा कराच्या नियमांत मनमानी बदल केले असल्याचा आरोप बी सी भरतीया आणि प्रविण खंडेलवाल यांनी केला. प्रत्येक राज्याला वस्तू सेवाकरात स्वतःचा स्वार्थ साधायचा आहे. त्यांना वस्तू सेवा करात सुसूत्रता नकोय. देशातील व्यापारी व्यवसाय करायच्या ऐवजी वस्तू सेवा कराची पूर्तता करण्यात गुंतले आहेत. हे सगळं देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक आहे. वस्तू सेवा कराच्या सद्य स्वरूपाची समीक्षा होणे गरजेचे आहे. मागील चार वर्षात या नियमांमध्ये ९३७ हुन अधिक वेळा बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे वस्तू सेवा कराचा मुळ ढाचाच बदलला आहे. वारंवार सांगूनही वस्तू सेवा कर परिषदेने कॅटने उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर विचार केलेला नाही. त्यामुळे आपली बाजू देशवासियांसमोर मांडण्यासाठी हा बंद घोषित केला असल्याचे सुरेशभाई ठक्कर म्हणाले.

 500 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.