डॉक्टर, पोलीस, अग्निशमन दल आणि सफाई कामगारांचा केला सत्कार
ठाणे : कोरोनाच्या महामारीत फ्रंटलाईनवर काम करणाऱया ठाणे महापालिका प्रभाग क्रमांक ८ मधील डॉक्टर, नर्स, पोलीस, अग्निशमन दल आणि सफाई कामगारांचा सन्मान सोहळा संजय भोईर फाऊंडेशच्या वतीने रविवारी आयोजित करण्यात आला. कोरोनाचा प्रादुर्भाव जेव्हा सुरु झाला तेव्हापासून काम करणाऱ्या या वॉरियर्सना आपल्या घरात सन्मान होत असल्याने त्यांचा आनंद द्विगुणित झाला होता.
ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोरोना काळात फ्रंटलाईनवर काम करून समाजासाठी मोठे योगदान देणाऱया कोरोना योद्ध्यांचा सन्मान सोहळा ठाणे महापालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक आणि स्थायी समिती सभापती संजय भोईर यांनी ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ढोकाळी येथील शरदचंद्र पवार मिनी स्टेडियम येथे आयोजित केला होता.
यावेळी व्यासपिठावर माजिवडा- मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त अनुराधा बाबर, कापुरबावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख, पोलीस उपनिरीक्षक पाटील, ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर, आयोजक संजय भोईर, नगरसेविका उषा भोईर, माजिवडा मानपाडा प्रभाग समितीचे अध्यक्ष भूषण भोईर, ज्युपिटर हॉस्पिटलचे निलेश शिंदे, शाखाप्रमुख साईनाथ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि महामानवांच्या तसबीर पूजनाने झाली.
प्रारंभी नगरसेविका उषा भोईर यांनी प्रास्ताविकात कोरोना काळात महिला वर्गाला आलेल्या अनुभवांचे कथन केले. कोरोना काळात कुटुंब एकत्र आले. सर्वांनी आनंद अनुभवला. मात्र त्यानंतर सर्वसामान्य जनतेचे हाल झाले. घरी असलेला शिधा संपला तेव्हा भोईर कुटुंबियांनी पुढाकार घेऊन प्रभागातील जनतेला यथायोग्य मदत केल्याचे सांगितले.
लॉकडाऊन झाल्यापासून फ्रंटलाईनवर काम करणाऱया माजिवडा- मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त अनुराधा बाबर यांनी पहिला रुग्ण सापडल्यानंतर ते आता लसिकरणाची झालेली सुरुवात या १० महिने कालावधीचा आपल्या अनुभवाचा धावता आढावा घेतला. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सर्वसामान्य जनता पॅनिक झाली होती. दिवसरात्र साफसफाई, फवारणी यासाठी सातत्याने फोन खणखणत होते. पालिका प्रशासन यासाठी सतर्क होते. नागरिकांच्या प्रत्येक समस्येवर आम्ही काम करत होतो. पालिका यंत्रणेबरोबरच नगरसेवक संजय भोईर यांनी स्वत:ची यंत्रणा उभारून आम्हाला खूप मोठे सहकार्य केल्याचे अनुराधा बाबर यांनी सांगितले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांनी पालिकेला केलेल्या सहकार्याची माहिती दिली आणि सर्व यंत्रणांचे कौतुक केले.
संजय भोईर यांनी जेव्हा प्रभागात पहिल्या रुग्णाची नोंद झाली तेव्हा पालिका यंत्रणा आणि रुग्णालय प्रशासन यांच्याशी कसा समन्वय साधला याची माहिती उपस्थितांना देत फ्रंटलाईनवर कार्य करणाऱ्या विभागातील सर्वांचे कौतुक केले.
ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर यांनीही कोराना रुग्ण सापडल्यावर त्यांच्या नातेवाईकांना कसा धीर दिला याची माहिती दिली.
कोरानाचा भारतात शिरकाव झाल्यावर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून महाराष्ट्रात सेव्हन हिल्स आणि मुंबईतील बीकेसी येथे १००० आणि १०२४ खाटांचे ओपन हॉस्पिटल तसेच ठाण्यात ग्लोबल हॉस्पिटलच्या उभारणीत महत्वपूर्ण योगदान देणारे ज्युपिटर हॉस्पिटलचे निलेश शिंदे यांनी आपले आलेले अनुभव कथन केले.
यावेळी कोरोना योध्दा म्हणून दिवस-रात्र काम करणाऱ्या माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त अनुराधा बाबर, कापूरबावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख, पोलीस उपनिरीक्षक पाटील, ज्युपिटर हॉस्पिटलचे निलेश शिंदे, प्रभागातील डॉक्टर्स, नर्सेस, अग्निशमन दल कर्मचारी, सफाई कर्मचारी यांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
520 total views, 1 views today