मुंबईकर गौरव, कश्यप यांचे पुरुष दुहेरीत वर्चस्व

जेएमडीवायसी पिकलबॉल; महिलांमध्ये जळगावच्या खेळाडूंची बाजी

मुंबई : गौरव राणे आणि कश्यप बरनवाल या मुंबईकरांनी शानदार खेळाचे प्रदर्शन करताना जेएमडीवायसी खुल्या पिकलबॉल स्पर्धेत पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले. त्याचप्रमाणे, वृषाली ठाकरे आणि साक्षी बाविसकर या जळगावच्या खेळाडूंनी महिला दुहेरीचे जेतेपद उंचावले. भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे (आयओए)  सहसचिव नामदेव शिरगावकर यांच्या उपस्थितीमध्ये विजेत्यांना गौरविण्यात आले.
जल मंगल दीप यूथ क्लब (जेमडीवायसी) आणि रोट्रॅक्ट क्लब ऑफ बॉम्बे यांच्या संयुक्त विद्यमानाने झालेल्या या स्पर्धेला अखिल भारतीय पिकबॉल संघटना (एआयपीए) आणि अमॅच्युअर पिकलबॉल फेडरेशन यांची मान्यता होती. विलेपार्लेच्या प्रबोधनकार क्रीडा ठाकरे संकुलाच्या गौरव-कश्यप यांनी नियंत्रित खेळ करताना मिहिर खंडेलवाल आणि प्रणव धोईफोडे यांचा सरळ दोन सेटमध्ये ११-९, ११-८ असा पराभव केला. महिलांमध्ये वृषाली-साक्षी यांनीही सरळ दोन सेटमध्ये जेतेपद निश्चित करताना औरंगाबादच्या आदिती जगताप आणि करिष्मा कालिके यांना ११-७, ११-५ असे नमविले.
मिश्र दुहेरीत करिष्मा-क्रिष्णा मंत्री या औरंगाबादच्या खेळाडूंनी वर्चस्व राखत निखिल सिंग राजपूत-शिव कंवर या राजस्थानच्या कसललेया जोडीला ११-७, ११-६ असा धक्का देत दिमाखात जेतेपद पटकावले. या गटात कांस्य पदकाची लढत जळगावच्या खेळाडूंमध्येच झाली. यामध्ये भूपेंद्र पोळ-साक्षी यांनी बाजी मारत अजय चौधरी-वृषाली यांचा ११-८, ११-९ असा पराभव केला.
४० वर्षांवरील गटात मुंबईचे वर्चस्व
मुंबईच्या अनुभवी खेळाडूंनी ४० वर्षांवरील गटात एकतर्फी वर्चस्व राखले. यामध्ये मिहिर खंडेलवाल-नोझर अमाल्सादिवाला या मुंबईकरांनी आक्रमक खेळ करताना संदीप तावडे आणि अशोक नथानी या मिरा रोडच्या खेळाडूंचा ११-७, ११-६ असा सहज पराभव केला.
१६ वर्षांखालील मुलांच्या अंतिम सामन्यात राजस्थानच्या तन सिंग शेखावत – अभिमन्यू शेखावत यांनी जेतेपद पटकावताना यश गायकवाड-तेजस गायकवाड या औरंगाबादच्या खेळाडूंना ९-११, ११-८, ११-७ असे नमवले. १६ वर्षांखालील मुलींमध्ये सम्राज्ञी परदेशी-कोमल राजदेव यांनी बाजी मारताना सौम्या लेले-आर्या कोकाटे यांचा १५-४ असा एकतर्फी पराभव केला.

 401 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.