व्यवसायवृद्धीसाठी मुरबाड तालुक्यातील २० गटांना २५ लाखांचे कर्ज

उमेद अभियानाच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण

ठाणे : उमेद अभियानाच्या समूहातील महिलांचे जीवनमान उंचविण्यासाठी स्वयंचलित व्यवसाय उपलब्ध व्हावे तसेच शाश्वत शेती करून समूहाचे उत्पन्न वाढावे यासाठी महिलांना कमीत कमी व्याजदराने अर्थ साहाय्याचा लाभ उमेद अभियानाच्या माध्यमातून दिला जातो. हा लाभ  मुरबाड तालुक्यातील २० गटांना नुकताच देण्यात आला.यासाठी एच. डी. एफ. सी.बँकेच्या नेरळ शाखेने २५ लाखांचे कर्ज मंजूर केले.
ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण विकास यंत्रणा विभागातर्गत महिला सक्षमीकरणासाठी उमेद अभियान राबविण्यात येते. प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान,  तालुका कक्ष कार्यालय पंचायत समिती मुरबाड अंतर्गत नवसंजीवनी महिला प्रभागसंघ सरळगाव येथे महिला मेळावा संपन्न झाला. या महिला मेळाव्यात प्रभागसंघ क्षेत्रातील सुमारे ३५ स्वयं साहाय्यता समूहांनी सहभाग घेतला. यावेळी २० गटांना २५ लाखांचे कर्ज एच. डी. एफ. सी.बँकेकडून मंजूर करून देण्यात आले.सदर गटांना या कर्जाचा लाभ सात दिवसांच्या आत मिळेल असें  बँकेकडून सांगण्यात आले आहे.
या मेळाव्यासाठी उमेद तालुका कक्ष कार्यालय मुरबाडचे तालुका अभियान व्यवस्थापक गुलाब चव्हाण , तालुका व्यवस्थापक अनिल राठोड, प्रभाग समन्वयक गणेश किरपन, सुप्रिया नारकर, बँकेचे नेरळ शाखा येथील जनसंपर्क अधिकारी निलेश भोसले, विकास धुमाळ व आशिष निकम,आणि स्वयं सहाय्यता समूहाच्या महिला उपस्थित होत्या.

 439 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.