निगेव्ह क्रिकेट अकॅडमीचा दणदणीत विजय

स्पर्धेतील पहिले अर्धशतक नोंदवताना वृषाली भगतने दोन जीवदानाचा फायदा उचलत नाबाद ५४ धावा केल्या. त्यात तिने एक षटकार आणि सहा चौकार मारले.

ठाणे : आघाडीच्या फळीतल्या फलंदाजांच्या जोरावर निगेव्ह क्रिकेट अकॅडमीने यजमान डॉ राजेश मढवी स्पोर्ट्स असोसिएशनचा नऊ विकेट्सनी दणदणीत पराभव करत ठाण्यात प्रथमच होत असलेल्या अर्जुन मढवी स्मृती महिला टी २० क्रिकेट लीग स्पर्धेत पहीला सामना जिंकला. सेंट्रल मैदानावर आजपासून सुरु झालेल्या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात प्रथम फलदाजी करताना डॉ राजेश मढवी संघाने मर्यादित २० षटकात २ बाद १४६ धावा केल्या. सानिका चाळकेने ५ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३८ धावा केल्या. महेक पोकर (३३), हुमेरा काझी(२९) आणि सिमरन शेखने २८ धावा करत संघाला समाधानकारक धावसंख्या उभारुन दिली. या आव्हानाचा पाठलाग करताना निगेव्ह क्रिकेट अकॅडमीने यजमान संघाच्या ढिसाळ क्षेत्ररक्षणाचा पुरेपूर फायदा उचलला. हेमाली बोरवणकर आणि वृषाली भगतने दुसऱ्या विकेटसाठी नाबाद १०१ धावांची शतकी भागीदारी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. स्पर्धेतील पहिले अर्धशतक नोंदवताना वृषाली भगतने दोन जीवदानाचा फायदा उचलत नाबाद ५४ धावा केल्या. त्यात तिने एक षटकार आणि सहा चौकार मारले. तर हेमाली बोरवणकरने चार चौकरांसह नाबाद ३९ ,धावा केल्या. त्याआधी तुशी शाह आणि हेमाली बोरवणकरने पहिल्या विकेटसाठी ४१ धावांची भागीदारी करत संघाच्या विजयाचा पाया रचला. तुशीने ८ चौकार मारत ४० धावा केल्या. या डावातील एकमेव विकेट सानिका चाळकेने मिळवली. प्रारंभी आमदार संजय केळकर यांनी स्पर्धेचे रितसर उदघाटन केले. त्यावेळी मुंबई क्रिकेट संघटनेचे कार्यकारिणी सदस्य नदीम मेमन, स्पर्धेचे प्रमुख संयोजक डॉ राजेश मढवी, नगरसेविका प्रतिभा मढवी, दीपा गावंड आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

 334 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.