भरधाव जाणाऱ्या वाहनांमुळे अपघात होण्याची वर्तवली भिती
कल्याण : कल्याणकरांच्या वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचा असणारा पत्री पूल वाहतुकीसाठी खुला झाल्याने कल्याणकरांची वाहतूक कोंडीतून मुक्तता झाली आहे. आता या पुलावर वाहतूककोंडी होत नसल्याने दोन्ही बाजूने येणारी वाहने हि वेगाने येत असतात. यामुळे पत्रीपुलाच्या कल्याण पश्चिमच्या बाजूस असणाऱ्या रहेजा कॉम्प्लेक्स परिसरातील नागरिकांना रस्ता ओलांडताना आणि ये जा करतांना अपघात होण्याची भीती वाटत आहे. यासाठी रहेजा कॉंप्लेक्स येथे सिग्नल व्यवस्था सुरु करण्याची मागणी मनसेचे शहर संघटक रुपेश भोईर यांनी पालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.
पालिका प्रशासनाच्या योग्य नियोजनामुळे कल्याण शहरात वाहतूक सिग्नल व्यवस्था कार्यरत झाली आहे. आई तिसाई देवी उड्डाण पुल (पत्री पुल) येथून दोन्ही बाजूस वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे. ज्यामुळे रहेजा कॉम्लेक्समध्ये राहणारे नागरिक जीव मुठीत घेऊन रास्ता ओलांडतात. त्याच बरोबर रहेजा कॉम्प्लेक्स मध्येच वाणी विद्यालय सुद्धा आहे. शाळा सुरु होताना आणि शाळा सुटताना विध्यार्थी यांना रस्ता ओलांडताना जीवाचा धोका होऊ शकतो. त्यामुळे रहेजा कॉम्प्लेक्सच्या प्रवेशद्वाराच्या ठिकाणी सिग्नल उभारण्याचे काम तातडीने हाती घेण्याची मागणी मनसेचे शहर संघटक रुपेश भोईर यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.
422 total views, 1 views today