अध्यात्मिक आघाडीच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाला सुरुवात
ठाणे : भाजपाच्या ठाणे शहरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आता राजकिय डावपेचांबरोबरच अध्यात्माचेही धडे मिळणार आहेत. भाजपाच्या आध्यात्मिक आघाडीच्या वतीने या नाविन्यपूर्ण उपक्रमाला सुरूवात झाली आहे. त्यानुसार खोपट येथील कार्यालयात दर महिन्याचा शेवटच्या गुरुवारी दुपारी ३ ते ४ या वेळात सत्संग आयोजित करण्यात येणार आहे.
राजकिय कोलाहलात कार्यकर्त्यांना मानसिक शांतीही गरजेची आहे, हा विचार करून भाजपाच्या अध्यात्निक आघाडीचे कोकण संयोजक विकास घांग्रेकर यांनी शहराध्यक्ष व आमदार निरंजन डावखरे यांना सत्संग आयोजित करण्याची कल्पना सुचविली. ती लगेचच आमदार डावखरे यांनी मान्य केली. त्यानुसार दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी दुपारी ३ ते ४ या वेळात सत्संग आयोजित केला जाईल. श्वसन, ओमकार, ध्यानधारणा आदींबरोबर आध्यात्मिक विचारांचा कार्यक्रमात समावेश करण्यात आला आहे.
आपल्या अध्यात्मिक परंपरा जोपासणे व जतन करणे आणि त्याचबरोबर सर्व समाजातील अध्यात्मिक सज्जन शक्ती एकत्र करणे हे दुसरे महत्वाचे कार्य आहे. त्याचबरोबर राजकिय घाईगर्दीच्या वातावरणात मानसिक शांतता देण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी माहिती कोकण संयोजक विकास घांग्रेकर यांनी दिली. सध्या भाजपाच्या खोपट येथील कार्यालयात सुरू असलेला हा कार्यक्रम यापुढील काळात मंडल स्तरावर आयोजित केला जाणार आहे.
554 total views, 1 views today