भावली पाणी योजनेला निधी उपलब्ध,प्रशासकीय मान्यताही मिळाली

शहापूरचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी मानले मंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार

शहापूर (शामकांत पतंगराव) : शहापूरचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी सातत्याने पाठपुरावा करून भावली पाणी योजना मंजूर करून आणल्याने भविष्यात शहापूर तालुक्यातील पाणी टंचाईचे संकट कायमचे दूर होणार आहे.या योजनेला नुकताच निधी उपलब्ध झाला असून प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याने बरोरा यांनी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची मंत्रालयात भेट घेऊन त्यांचे आभार मानले.
शहापूर तालुक्यात भातसा,तानस व वैतरणा अशी मोठी जलाशये असून त्यातून मुंबईला पाणीपुरवठा होतो.असे असतानाही तालुक्यातील २८५ गांवे, वाड्या व पाडे यांना
पाणीटंचाईचा तिव्र सामना करावा लागतो.
येथील महिलांना भर उन्हाळ्यात उष्णतेच्या झळा सोसत मैलोनमैल पायपीट करत डोक्यावरून हंड्या कळशीने पाणी आणावे लागते.यात काहींना उष्माघाताचा त्रास होऊन जिवावरही बेतले आहे.
धरण उशाला, कोरड घशाला अशी परिस्थिती असलेल्या शहापूर तालुक्यातील पाणी टंचाई दूर व्हावी व येथील जनतेची तहान भागविण्यासाठी भावली गुरुत्वाकर्ष पाणी योजनेसाठी माजी आमदार पांडुरंग बरोरा यांचे सहा ते सात वर्षांपासून प्रयत्न सुरू होते.शासन दरबारी अनेक वेळा
पत्रव्यवहार केले,संबंधित खात्यातील वरीष्ठ अधिकारी,मंत्री महोदय यांच्याशी सातत्याने
चर्चा करून अखेर भावली गुरुत्वाकर्षण पाणी योजनेला निधी उपलब्ध झाला व प्रशासकीय मंजुरीही मिळाली.या साठी सतत मदत केलेले पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची आज माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी मंत्रालयातील दालनात भेट घेऊन समस्त शहापूर तालुक्याच्या वतीने आभार मानले.
यावेळी भावली पाणी योजनेचा पाठपुरावा करणारे ठाणे जिल्हा परीषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी व संचालक, महाराष्ट्र जिवन प्राधिकरण किशोरराजे निंबाळकर तसेच गुलाबराव पाटील यांचे खाजगी सचिव अशोक पाटील उपस्थित होते
“भावली पाणी योजनेचे काम निविदा प्रक्रिया होऊन जलदगतीने सुरू करा अशा प्रकारच्या सूचना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधीक्षक अभियंता यांना दिल्या तसेच भावली पाणी योजनेच्या कामाचा कार्यरंभ आदेश ३१ मार्च २०२१ करण्याचे सांगितले. भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शुभहस्ते होईल!”असे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

 484 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.