अनुसूचित जाती, जमातीच्या महिला नवउद्योजकांना विनामूल्य मार्गदर्शन
मुंबई : दलित इंडियन चेंबर ॲाफ काॅमर्स ॲण्ड इंडस्ट्री अर्थात डिक्कीच्या महिला विभाग प्रमुख सीमा मिलिंद कांबळे या गुरुवार, २८ जानेवारी रोजी दुपारी २.३० वाजता, ८- अ, पहिला मजला,चंन्द्रोद्य सोसायटी, एसजी बर्वे मार्ग, स्वास्तिक पार्क चेंबूर येथे मुंबईतील महिला उद्योजकांना मार्गदर्शन करणार आहेत. कोरोना पश्चात उद्योग-व्यवसाय डबघाईस आले असता आपला उद्योग कसा वाढवावा या विषयावर त्या महिला उद्योजकांशी संवाद साधणार आहेत.
कोरोना काळात अवघं जग आर्थिक गर्तेत अडकलेले आहे. या जागतिक महामारीमुळे अनेक व्यवसाय ठप्प झाले. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. अशावेळी घरची स्त्री ठामपणे उभी राहिली. कोरोनाशी सामना करता करता ती आर्थिक बाजू देखील सांभाळू लागली. अनेक महिलांनी लाॅकडाऊन पश्चात छोटे मोठे व्यवसाय सुरु केले. मात्र योग्य नियोजनाअभावी त्यांचा उद्योजकीय प्रवास अडखळत आहे.
विशेषत: या महिला उद्योजिकांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सीमा मिलिंद कांबळे थेट पुण्याहून डिक्कीच्या चेंबूर येथील विभागीय कार्यालयास भेट देणार आहेत.
आपला व्यवसाय इतर उद्योजकांपर्यत पोहोचविण्याची ही नामी संधी आहे, या बैठकीस उपस्थित राहून महिला उद्योजकांनी आपला व्यवसाय वृद्धिंगत करावा असे आवाहन डिक्कीच्या मुंबई महिला विभागाने केले आहे.
412 total views, 1 views today