टक्केवारीमुळे नालेसफाई फक्त कागदावर

आमदार संजय केळकर यांचा आरोप

ठाणे : टक्केवारीमुळे नालेसफाई फक्त कागदावर दिसते. त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे, त्यामुळे नागरिकांनीच टक्केवारी गँग उद्ध्वस्त करण्याची वेळ आली आहे, असे आवाहन आमदार संजय केळकर यांनी केली.
ठाणे विधानसभा मतदार संघातील बाळकूम आणि ढोकाळी येथील नाल्यांची पाहणी आज आमदार संजय केळकर यांनी केली. पातलीपाडा येथील माझी आई शाळेजवळ असलेला नाला उघडा असून नालेसफाई न झाल्याने तेथे मोठ्या प्रमाणात कचरा तुंबला आहे. त्यामुळे दुर्गंधीसह मोठ्या प्रमाणात डासनिर्मिती होत असल्याचे आजच्या पाहणी दौ-यात दिसून आले. परिसरातील हजारो नागरिकांचे आरोग्य यामुळे धोक्यात आले आहे. तर लोढा येथील नाल्याचीही अशीच दुरवस्था असल्याचे आमदार केळकर यांनी सांगितले.
टक्केवारीमुळे नालेसफाई होतच नाही. फक्त कागदावर नालेसफाई दाखवून बिले काढली जातात, पैसे काढले जातात. त्याचा फटका मात्र  लाखो करदात्यांना नाहक बसतो. टक्केवारीची गँग नागरिकांनाच उद्ध्वस्त करावी लागेल. मी सुद्धा याचा पाठपुरावा करत आहे, असे केळकर यांनी सांगितले. यावेळी उपस्थित अधिका-यांना त्यांनी निर्देश दिले.
पाहणी दौ-यात माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीतील कार्यकारी अभियंता संजय कदम, कानिष्ठ अभियंता पवार उपस्थित होते. यावेळी भाजपाचे पदाधिकारी संजय पाटील, सुरज दळवी, निलेश पाटील, मत्सगंधा पवार, रवी रेड्डी, तन्मय भोईर, हेमंत म्हात्रे, जितेंद्र मढवी आदी सहभागी झाले होते.

 431 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.