सोमवारी मुख्यमंत्र्यांच्याहस्ते होणार पत्रीपुलाचे ऑनलाईन लोकार्पण


पुलाच्या नामांतरावरून वाद होण्याची शक्यता   
कल्याण  : कल्याण डोंबिवलीकरांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेल्या पत्रीपुलाचे काम पूर्ण झाले असून येत्या सोमवारी २५  जानेवारीला हा नवा पूल नागरिकांच्या सेवेमध्ये रुजू होणार असल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ऑनलाइन सोहळ्याच्या माध्यमातून या पुलाचे लोकार्पण केले जाणार आहे.
कल्याण पूर्व, डोंबिवलीला जोडण्यासह नवी मुंबईकडे जाण्यासाठी पत्रीपुल हा महत्वाचा धागा आहे. मात्र मुंबईतील रेल्वेपुलाच्या दुर्घटनेनंतर पत्रीपुलासह रेल्वेवरील सर्वच पुलांचे ऑडिट करण्यात आले. त्यामध्ये कल्याणचा ऐतिहासिक पत्रीपुल हा वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचे समोर आले. त्यामुळे वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असणारा हा उड्डाणपूल ऑगस्ट २०१८ मध्ये बंद करण्यात आला. तर नोव्हेंबर २०१८ मध्ये जुना पत्रीपुल जमीनदोस्त करण्यात आला. तेव्हापासून आजपर्यंत अनेक शासकीय, तांत्रिक अडचणींसह कोरोनामुळे आलेल्या लॉकडाऊनचा सामना करत आज अखेर पत्रीपुलाचे काम पूर्णत्वास आले आहे. या पत्रीपुलाच्या कामासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सुरुवातीपासून रेल्वे खात्यासह राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता.
दरम्यान हा पत्रीपूल नागरिकांसाठी खुला होत असला तरी या पुलाच्या नामांतरावरून वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पुलाला माजी कामगार मंत्री शाबीर शेख यांचे नाव देण्याची मागणी कॉंग्रेसचे ब्लॉकअध्यक्ष शकील खान यांनी केली होती. त्यानुसार ६ नोव्हेंबर २०२० रोजी पार पडलेल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या  महासभेत सूचक नगरसेवक सचिन बासरे  आणि अनुमोदक नगरसेवक सुधीर बासरे यांनी मांडलेल्या या नामांतराच्या प्रस्तावाला महासभेने मंजुरी दिली असून त्यानुसार ‘शिवभक्त शाबिरभाई शेख सेतू’ असे नाव देण्यात आले आहे. मात्र काही लोकप्रतिनिधी या पुलाला ‘आई तिसाई देवी पूल’ हे नाव तर काहींनी ‘हिंदूह्रदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे’ यांचे नाव देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे उद्घाटनादिवशी पुलाच्या नामांतरावरून वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.    

 393 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.