भाजपचे शहर उपाध्यक्ष मिलींद बनकर पुन्हा स्वगृही राष्ट्रवादीत दाखल

बनकर यांच्या घरवापसीनंतर ठाणे पूर्वेकडील आनंद नगर, गांधी नगर भागातून भाजप नामशेष होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

ठाणे : भाजपचे ठाणे शहर उपाध्यक्ष मिलींद बनकर आणि त्यांची पत्नी माजी नगरसेविका संगिता बनकर यांची घरवापसी झाली आहे. शुक्रवारी त्यांनी गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष माजी खासदार आनंद परांजपे यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
मिलींद बनकर हे आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होते. मधल्या काळात त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, भाजपमध्ये काम करण्यास कोंडी होत असल्याने त्यांनी डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून डॉ. आव्हाड यांच्या निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्त्यांनीही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. आनंद नगर भागामध्ये मिलींद बनकर यांच्यामुळे भाजपचा चंचूप्रवेश झाला होता. मात्र, बनकर यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर ठाणे पूर्वेकडील आनंद नगर, गांधी नगर भागातून भाजप नामशेष होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
या प्रसंगी मिलींद बनकर यांनी सांगितले की, भाजपमध्ये कामाचे चीज होत नसल्यानेच माझ्या प्रभागातील नागरिकांनी मला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याबाबत सूचना केली होती. त्यामुळेच मी स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला. गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड आणि शहराध्यक्ष आनंद परांजपे हे सामान्यांच्या हितासाठी रात्रंदिवस काम करीत असतात. त्यामुळे या दोघांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन ठाणे पूर्वमध्ये वाढविण्यासाठी काम करणार आहोत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठाणे शहर महिलाध्यक्षा सुजाता घाग, युवक अध्यक्ष विक्रम खामकर, परिवहन समिती सदस्य नितीन पाटील, विक्रांत घाग यांच्यासह राष्ट्रवादीच्या सर्व फ्रंटल सेलचे अध्यक्ष, कार्यकारिणी सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.

 315 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.