कॅटने मानले केंद्र सरकारचे आभार

केंद्र सरकारने व्हॉट्सअपला दिले गोपनीयता नियमांना स्थगिती देण्याचे निर्देश

मुंबई : आपल्या मनमानी कारभारानुसार भारतीयांवर गोपनीयतेचे नियम लादणाच्या प्रयत्नात असलेल्या व्हॉटसअप या सोशल मिडियाला अखेर केंद्र सरकारने चाप लावला आहे.केंद्र सरकारच्या या निर्णयाचे कॉनफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) स्वागत केले आहे. कॅटचे महाराष्ट्र उपाध्यक्ष आणि ठाणे जिल्हा होलसेल व्यापारी वेलफेयर महासंघाचे अध्यक्ष सुरेशभाई ठक्कर म्हणाले, ८ फेब्रुवारीपासून देशात गोपनीयतेचे एकतर्फी नियम लागू करण्याच्या प्रयत्नात असलेल्या व्हाट्सअपला केंद्र सरकारने अटकाव केल्याबद्दल व्यापारी त्यांचे आभार मानत आहे. सरकारच्या या निर्णयामुळे देशाच्या घटनेने भारतीय नागरिकांना दिलेले महत्वाचे अधिकार अबाधीत राहिले आहेत.
सुरेशभाई ठक्कर म्हणाले व्हाट्सअपच्या गोपनियतेशी संबंधित नवे नियम रद्दबातल करण्यासाठी कॅटने थेट सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. व्हाट्सअपच्या नव्या नियमांमुळे घटनेने भारतीय नागरिकांना दिलेल्या विविध महत्वाच्या अधिकारांवर गदा येत असल्याचा आरोप सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत केला होता. देशातील नागरिक आणि व्यावसायिकांची गोपनीयता अबाधित राहण्यासाठी व्हॉट्सअप सारख्या बड्या उद्योजकांकरता केंद्र सरकारला धोरण आखण्यासाठी सूचना करावी अशी विनंती या याचिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयाला कॅटने केली होती.
कॅटने या याचिकेत पौर्वात्य देश आणि भारतीयांसाठी केलेल्या गोपनियतेच्या नियमांतील फरकांमुळे भारतीय युझर्सच्या गोपनीय माहितीचा अद्ययावत तंत्रज्ञान वापरणाऱ्या आस्थपना कसा गैरवापर करु शकतात याकडे सर्वोच्च न्यायालयाचे लक्ष वेधले होते. कॅटचे विधी सल्लागार ऍडव्होकेट विवेक नारायण यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे. व्हॉटसअपने भारतात प्रवेश करताना युझर्सची माहिती गुप्त ठेवली जाणार असल्याचे सांगत भारतीयांना आपल्याकडे आकर्षित केले होते. २०१४ साली फेसबुकने व्हॉट्स अप वर ताबा मिळवल्यानंतर आपली गोपनीय माहिती उघड होत असल्याच्या तक्रारी होत होत्या. फेसबुकवर नियंत्रण मिळवल्यावर गोपनीयतेचे नियम बदलणार नसल्याचे व्हॉट्स अपने जाहीर केले होते. पण २०१६ पासून व्हॉट्स अपने गोपनियतेसंदर्भातील आपल्या नियमांना तिलांजली देत युझर्सची माहिती इतर कंपन्यांना पुरवली होती. त्यामुळे भारतीय नागरिक आणि व्यावसायिक हित अबाधित राखण्यासाठी कॅटने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. तसेच केंद्र सरकरकडेही कॅटने व्हॉट्सअपच्या यानिर्णयाच्या विरोधात आक्षेप नोंदवले होते व्हॉट्सअपला आपला निर्णय बदलण्यास भाग पाडल्याबद्दल कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी सी भरतीया आणि राष्ट्रीय सरचिटणीस प्रविण खंडेलवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचे आभार मानले आहेत.

54 total views, 1 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *