प्रादेशिक परिवहन ठाणे कार्यालयातर्फे ३२ व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचे आयोजन



सुमारे महिनाभर राबवणार रस्ते सुरक्षा विषयक कार्यक्रम

ठाणे :  प्रादेशिक परिवहन विभागातर्फे ३२ व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार १८ जानेवारीरोजी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या अभियानाची सुरुवात होणार असून महिनाभर चालणाऱ्या या अभियानातंर्गत रस्ते सुरक्षा विषयक विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे ठाण्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विश्वभंर शिंदे यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ असलेल्या नियोजन भवन येथेया राष्ट्रीय सुरक्षा अभियानाचे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रितसर उदघाटन  होणार आहे. या कार्यक्रमास खासदार आणि केंद्र शासनाच्या जिल्हा रस्ते सुरक्षा समितीचे अध्यक्ष कपिल पाटील, ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, ठाणे ग्रामिणचे पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने,  ठाण्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विलास कांबळे, ठाण्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ कैलास पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या अभियानात मंगळवार १९ जानेवारीला वायू प्रदूषण करणाऱ्या वाहनांची तपासणी मोहीम आयोजित करण्यात आली आहे. सोमवार २५ जानेवारीला ऑटो रिक्षाचालकांसाठी कार्यशाळा होणार आहे.  बुधवार २७  जानेवारीला जिल्ह्यातील विविध टोल नाक्यांवर रस्तासुरक्षक साहित्याचे वाटप करणार आहेत. शनिवार ३० जानेवारी रोजी महिलांची बाईक रॅली होईल. शहरातील प्रमुख मार्गावरून फिरणाऱ्या या बाईक रॅलीसाठी सिने अभिनेते डॉ गिरीश ओक उपस्थित राहणार आहेत. शनिवार ६ फेब्रुवारी रोजी शालेय विदयार्थ्यांची वाहतूक करणारे चालक आणि त्यांच्या सहकाऱ्यांसाठी कार्यशाळा होईल.  मंगळवार ९ फेब्रुवारी रोजी रिक्षा, टॅक्सी चालकांना  कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी याचे मार्गदर्शन करण्यात येईल. बुधवार १० फेब्रुवारीला दुचाकी वाहनांची मोफत यांत्रिकी   तपासणी शिबीर होणार आहे. बुधवार १७ फेब्रुवारी रोजी या अभियानाची सांगता होणार असून समारोपाच्या कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी वैदही रानडे,  अपर पोलीस आयुक्त संजयसिंह येनपुरे उपस्थित राहणार असल्याचे ठाण्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंतकुमार पाटील यांनी सांगितले.

 349 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.