कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातील रिक्षास्टॅण्ड ८ महिन्यांनी झाला खुला

रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशनच्या पाठपुराव्याला यश
कल्याण : कोरोना महामारी सुरु झाल्यापासून लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातील रिक्षा स्टॅण्ड देखील सील करण्यात आला होता. रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशनने रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करून हा रिक्षा स्टॅण्ड खुला करण्याची मागणी केली होती. त्यानुसार आजपासून हा रिक्षा स्टॅण्ड तब्बल ८ महिन्यांनी खुला करण्यात आला आहे.
कोरोनाची परिस्थिती काहीशी नॉर्मल होत असतांना जनजीवन देखील काही प्रमाणात सुरळीत सुरु झाले आहे. असे असतांना कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातील रिक्षा स्टॅण्ड मात्र बंदच होता. रिक्षा स्टॅण्ड बंद असल्याने स्टेशन परिसरातील रस्त्यावर रिक्षांची मोठी गर्दी होत होती. प्रवाशांना देखील याचा त्रास होत होता. याबाबत रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशनने रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करत हा रिक्षा स्टॅण्ड सुरु करण्याची मागणी केली होती. पत्रव्यवहार करून देखील रेल्वे प्रशासनाने रिक्षा स्टॅण्ड खुले करण्यासंदर्भात कोणतेही पाउल न उचलल्याने अखेर रिक्षा चालकांनी आंदोलनाचा इशारा दिला होता.
       रिक्षा चालकांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर रेल्वे प्रशासनाने मंगळवारी रिक्षा संघटना, रेल्वे प्रशासन यांची संयुक्त बैठक घेत यावर तोडगा काढण्यासाठी चर्चा केली. या बैठकीत रेल्वे प्रशासनाचे अधिकारी, व.पोलिस निरिक्षक नारायण  बानकर, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील, रेल्वे पोलिसांचे वाल्मिक शार्दुल, अजित माने, पवन कुमार, रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशनचे प्रकाश पेणकर, संतोष नवले, जितेंद्र पवार, विलास वैद्य, बंडू वाडेकर, विजय डफळ, काका मढवी, शगिर शेख, आबा भासमारे, वसंत पाटील, अनिल जगताप, प्रताप सरोदे आदी पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर अखेर आजपासून हा रिक्षा स्टॅण्ड खुला करण्यात आला असून यामुळे रिक्षा चालक आणि प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे.    

 362 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.