म्हाळगी व्याख्यानमालेत कैलास जीवनच्या कोल्हटकरांचा नवउद्योजकांना कानमंत्र
ठाणे : सातत्य आणि किमान हजार दिवस प्रामाणिक प्रयत्न केल्यास कुठलीही गोष्ट कठीण नाही. त्यासाठी अभ्यास देखील गरजेचा असुन अभियंता असाल तर, अर्थ व वाणिज्य विषयक बाबींचे ज्ञानही आवश्यक आहे. असा मौलिक कानमंत्र ‘कैलास जीवन’चे निर्माते प्रख्यात मराठी उद्योजक वासुदेव शिवराम कोल्हटकर उर्फ कोल्हटकर बुवा यांचे नातू परेश कोल्हटकर यांनी नवउद्योजकांना दिला आहे. ठाण्यातील सरस्वती सेंकडरी स्कुलच्या सभागृहात रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेत ‘मराठी पाऊल पडते पुढे’ हे पाचवे पुष्प मंगळवारी गुंफण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासमवेत व्यासपिठावर बुवांचे पुत्र राम कोल्हटकर हेही होते. प्रा. किर्ती आगाशे यांनी या उद्योजक द्वयीचे अथ ते इतीपर्यत उद्यमशिलतेचे पैलु उलगडले. प्रारंभी रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी कोल्हटकर यांचे स्वागत फळांची परडी देऊन केले.
किर्तनकार ते यशस्वी उद्योजक बनलेल्या कोल्हटकर बुवा यांच्या ‘कैलास जीवन’ या अस्सल महाराष्ट्रीयन उत्पादनाची व्याप्ती १२ राज्यांसह इटली, स्वित्झर्लंड व युरोपातील सहा देशात पसरली आहे. उदयमशिलतेच्या या भरभराटीचा दापोली व्हाया गोवा ते पुणे, धायरी हा जीवनपट श्रीयुत राम आणि परेश कोल्हटकर या काका-पुतण्या द्वयीने ठाण्यात उलगडला. शिवाजीच्या काळात तुपाने भरलेल्या रांजण अथवा विहीरीतील वंगण जखमेवर लावले जात असे. त्याच्यावर बुवांनी अभ्यास करून त्यात अनेक बाबींचा अंतर्भाव करीत सुरुवातीला ‘कैलास लोणी’ ही प्रयोगशिलतेची आयुर्वेदीक निर्मिती घडवली. इतकेच नव्हे तर,वयाच्या २२ व्या वर्षीपासुन बुवांनी आपल्या किर्तनातून याचा सर्वदूर प्रसार केल्याने बाहेरून लावण्यासह पोटात प्राशनही करता येईल, असे पहिलेच औषध ‘कैलास जीवन’ नावाने प्रसिद्ध झाले.आज रामदेव बाबा व्यायामातुन तर,त्या काळात आजोबांनी (बुवांनी) किर्तनातुन कैलास जीवन नावारूपाला (मार्केटींग) आणल्याचे परेश अभिमानाने सांगतात.
स्वच्छ व्यवहार असेल तर,कसलाही फरक पडत नाही, हा शिरस्ता कायम जपल्याने नोटबंदी व कोरोना काळातदेखील आपल्या उदयोगाला झळ बसली नसल्याचे त्यांनी सांगितले. कोविड काळात कामगारांना अतिरिक्त वेतन देऊन कामात गुंतवल्याने उत्पादनात वाढ झालीच. किंबहुना, कोरोनाचा प्रादुर्भावही टाळता आला.पुढे बोलताना राम यांनी, तिसरी पिढी उद्योगात स्थिरावण्यामागे नवा किंवा जुना विचार असे नसुन ‘विचार’ बरोबर आहे की नाही, हे खरे गमक असुन उत्पादनाचा दर्जा कायम ठेवला तर ग्राहक देखील दुरावत नसल्याचे स्पष्ट करून, कुठलीही गोष्ट करताना किंबहुना, यशस्वी होण्यासाठी किमान एक हजार दिवस प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगितले.
382 total views, 1 views today