वर्तमानात जगण्यासोबतच मानसिक आरोग्य जपण्याचा संकल्प करा

कोरोनाविरूदध लढण्यासाठी डॉ.शिल्पा आडारकर यांचा मौलिक सल्ला

 ठाणे : कोविडचा प्रादुर्भाव झाला म्हणुन २०२० या वर्षाला अगदीच वाईट म्हणुन चालणार नाही. या वर्षात अनेक धक्के – टोणपे खावे लागले असले तरी, गतवर्ष गुरुस्थानी मानायला हवे. किंबहुना, सद्यस्थितीत वर्तमानात जगण्यासह मानसिक आरोग्य जपण्याचा संकल्प प्रत्येकाने केल्यास कुठल्याही विषाणुचा किंवा ताणतणावाचा प्रभाव कमी करता येईल. असा मोलाचा सल्ला केईएम रुग्णालयातील अधिव्याख्यात्या डाँ.शिल्पा आडारकर यांनी दिला आहे. ठाण्यातील सरस्वती सेंकडरी स्कुलच्या सभागृहात रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेतील दुसरे पुष्प गुंफताना त्या बोलत होत्या. गेली ३५ वर्षे ज्ञान, प्रबोधन आणि मनोरंजन या त्रिसुत्रीनुसार रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेचे मोजक्याच निमंत्रितांसह ऑनलाईन आयोजन ठाण्याचे भाजप आमदार संजय केळकर यांनी केले आहे. शनिवारच्या या सत्राचे सुत्रसंचालन नंदिनी गोरे यांनी केले.
‘कोविड नंतरची सद्यस्थिती व मानसिक आरोग्य’ या विषयावर बोलताना डॉ. शिल्पा आडारकर यांनी,२०२० या वर्षातील कोविड काळातील लॉकडाऊन ते अनलॉकपर्यतच्या जनजीवनातील बऱ्या-वाईट बाबींचा उहापोह केला. कोविडने वर्क फ्रॉम होम (WHF) सारखे परवलीचे शब्द दिले असले तरी यामुळे सोशल मिडीयासोबतच व्हॉटसअप युनिव्हसिटी फोफावल्याने अनेकांना स्वावलंबनाचे धडे,एकत्र कुटुंब पद्धती, वैविध्यपूर्ण पाक कौशल्यासह कलात्मकतेची अनुभूती घेता आली. या काळात एकमेकांना मदत करण्याच्या भावनेने अनेक दाते निर्माण झाले किंबहुना, जगण्यासाठी कमीतकमी गोष्टींची गरज भासते, हे या काळाने शिकवले. मात्र, हळुहळु या जीवनपद्धतीचाही कंटाळा येऊन कोरोना मारेल की नाही माहित नाही पण एक दिवस आम्ही एकमेकांना मारू अशी भावना वाढीस लागली. या काळात अनेकांचे रोजगार-व्यवसाय हिरावले गेल्याने नैराश्येतुन व्यसनाधिनता वाढुन आत्महत्येचे प्रकार घडले. अत्याचार, बाललैंगिक छळ, घटस्फोटाची प्रकरणे वाढली,सोशल डिस्टन्सींग पाळण्यामुळे एकटेपणाची भावना वाढुन ज्येष्ठांमध्ये नैराश्याची भावना, मुलांमध्ये आक्रमकता तर,तरूणाईमध्ये उदासिनता पसरल्याने वैफल्य वाढले. लॉकडाऊनमध्ये घरूनच काम केल्याने सतत स्क्रिनसमोर राहील्याने स्थूलता वाढण्याबरोबरच झोपेच्या, डोळ्यांच्या आणि इतर शारीरिक व्याधींच्या तक्रारी वाढल्या. असे असले तरी, २०२० या वर्षाला अगदीच नावे ठेवुन चालणार नसून हे वर्ष गुरूस्थानी मानायला हवे.कारण याच काळात वेळेचे नियोजन, स्वच्छता, मास्कचा नियमित वापर आणि संतुलीत आहाराची सवय लागल्याने आरोग्यावर सकारात्मक परिणाम झाल्याचे डॉ.आडारकर यांनी सांगितले. अनलॉकनंतर काहींच्या बेजबाबदारपणामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने आरोग्य व्यवस्थेवर ताण आल्याचे स्पष्ट करीत डॉ.आडारकर यांनी प्रत्येकाने दीर्घ श्वसनाची सवय लावून घेणे आरोग्यदायी ठरेल. त्याचबरोबर,माझं कुटुंब, माझी जबाबदारी याप्रमाणे माझं मानसिक आरोग्य ही माझीजबाबदारी ओळखणे गरजेचे आहे.तसेच, वर्तमानात जगण्यासह मानसिक आरोग्य जपण्याचा संकल्प प्रत्येकाने केल्यास कुठल्याही विषाणुचा प्रभाव कमी करता येईल.असा मौलिक सल्लाही डाँ.आडारकर यांनी या व्याख्यानमालेच्या निमित्ताने सर्वाना दिला आहे. दरम्यान,व्याख्यानानंतर उपस्थित श्रोत्यांच्या मनातील शंकांचे निरसनही डाँ. शिल्पा आडारकर यांनी केले.

 494 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.