रेझिंग डे निमित्त तक्रारदारांच्या ऐवजाचे हस्तांतरण

५० तोळे सोने, १८ दुचाकी, एक चारचाकी, एक सायकल, ८ मोबाईल फोन तसेच ७५ हजार रुपयांची रोकड असा मुद्देमाल ५१ तक्रारदारांना परत करण्यात आला.
ठाणे : ठाणे पोलीस आयुक्ताच्या मार्गदर्शनाखाली २ ते ८ जानेवारी दरम्यान पोलीस रेझिंग डे साजरा होत असून यानिमित्ताने दररोज विविध कार्यक्रमाचे आयोजन पोलिसाकडून करण्यात आले आहे. यावेळी ४९ गुन्ह्यांमधील तब्बल ५१ तक्रारदारांचा सुमारे ४९ लाख २१ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल परत करण्यात आल्या. यामध्ये एटीएम मधील रोकडसह महिलाच्या गळ्यातील दागिन्याचा समावेश होता.
विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेल्या वस्तू नागरिकांना परत देण्याचा कार्यक्रम एनकेटी सभागृह, खारकर आळी येथे अप्पर पोलीस आयुक्त अनिल कुंभारे, पोलीस उपायुक्त अविनाश अंबरे, सहाय्यक पोलीस आयुक्त निता पाडवी, सुनील घोसाळकर यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला.
दरम्यान तक्रार दाखल झाल्यानंतर गुन्हेगाराचा माग काढत त्यांच्याकडून चोरीचे सामान जप्त करण्यास पोलिसांना बराच कालावधी लागतो. या काळात संबधित तक्रादाराचा पत्ता, फोन नंबर बदलत असल्याने या तक्रारदाराचा शोध घेणे कठीण होत असल्याने जप्त केलेला माल पोलिसांच्या गोडाऊनमध्ये पडून राहतो. जोपर्यत तक्रारदार समोर येत नाही तोपर्यत त्यांना हा मुद्देमाल परत देता येत नाही. शिवाय, तक्रारदारालाही अनेकदा न्यायालयीन प्रक्रिया पार पाडावी लागत असते. त्यावर मात करण्यासाठी ठाणे पोलिसांनी रेझींग डे च्या निमित्ताने तक्रारदारांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित करुन मुद्देमाल परत केला. त्यामध्ये ५० तोळे सोने, १८ दुचाकी, एक चारचाकी, एक सायकल, ८ मोबाईल फोन तसेच ७५ हजार रुपयांची रोकड असा मुद्देमाल ५१ तक्रारदारांना परत करण्यात आला.
यावेळी ठाणे नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामराव सोमवंशी, नौपाडा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरुण सोंडे यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.

 507 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.