अशा जाहिरातीबाबत नियमावली तयार करण्याची कॅट करणार सूचना आणि प्रसारण मंत्रालयाला विनंती
मुंबई : चमत्कारी, अलौकिक शक्ती असल्याचा दावा करत विविध वस्तुंची विक्री करण्यावर बंदी घालण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच दिले आहेत. टीव्हीवरील जाहिरातींद्वारे अशा वस्तूंची मोठया प्रमाणात विक्री होत असे. न्यायालयाने हे अवैध असल्याचे सांगत अशा वस्तू विकायला मनाई केली आहे. न्यायालयाच्या या निर्णयाचे कॉंफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने(कॅट) या निर्णयाचे स्वागत केले आहे. न्यायालयाचा हा निर्णय क्रांतिकारक असून त्यामुळे खोट्या आणि भ्रामक दावे करणाऱ्यांपासून लोकांची सुटका झाली असल्याचा विश्वास कॅटचे महाराष्ट्र उपाध्यक्ष आणि ठाणे जिल्हा होलसेल व्यापारी वेलफेअर महासंघाचे अध्यक्ष सुरेशभाई ठक्कर यांनी व्यक्त केला.
न्यायालयाच्या या निर्णयावर मत व्यक्त करताना सुरेशभाई ठक्कर म्हणाले, या निर्णयानंतर केंद्र सरकारने या संदर्भात एक धोरण आखायला पाहिजे. कॅटचे शिष्टमंडळ लवकर केंद्रीय प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेऊन सरकारने याबाबत तातडीने धोरण आखण्याची विनंती करणार आहे.
काळी विद्या, जादु अधिनियमाच्या तिसऱ्या नियमानुसार अशा पध्दतीने विशिष्ट प्रथा आणि जादुचा प्रसार आणि प्रचार करण्यास मनाई आहे. अधिनियमाच्या ३(२) कलमानुसार अशा वस्तुंची जाहिरात करणेही गुन्हा असल्याचे न्यायालयाच्या निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. चमत्कारी आणि अंधविश्वासाला खतपाणी घालणारी सामुग्रीची जाहिरात करणाऱ्या टीव्ही वाहिन्याही काळी जादु अधिनियमाच्या कलम ३ नुसार जबाबदार आहेत.
अशा तऱ्हेच्या जाहिरातींना अटकाव करण्यासाठी सक्षम यंत्रणा तयार करण्याचे निर्देश न्यायालयाने महाराष्ट्र शासनाला दिले आहेत. एखाद्या वाहिनीवरून अशा स्वरूपाची जाहीरात प्रसारित होत असल्यास त्या जाहिरातीचे प्रसारण थांबवून ती पुन्हा दाखवली जाणार नाही याची दक्षता ही यंत्रणा घेईल. कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी सी भरतीया आणि राष्ट्रीय सरचिटणीस प्रविण खंडेलवाल म्हणाले, न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आदर राखताना, अशा स्वरूपाच्या जाहिराती प्रसारित करु नयेत. तसेच अशा कृत्यांना बढावा देणाऱ्या टीव्ही वाहिन्या आणि व्यक्तिविरुध्द कारवाई करावी त्याकरता राष्ट्रीय पातळीवर वेगळा विभाग तयार करण्याची मागणी सूचना आणि प्रसारण मंत्रालयाकडे करणार आहोत.
528 total views, 1 views today