मालावर बहिष्कार टाकून चीनचे १लाख कोटी रुपयांचे नुकसान करण्याचे भारतीय व्यापाऱ्यांचे लक्ष्य

कॅट यंदाचे २०२१ वर्ष भारतीय व्यापार सन्मान वर्ष म्हणून पाळणार

मुंबई : यंदाचे २०२१ वर्ष भारतीय व्यापार सन्मान वर्ष म्हणून पाळणार असल्याची घोषणा कॉंफेडरेशन ऑफ इंडिया ट्रेडर्सने (कॅट) केली आहे. त्यानिमित्ताने संपूर्ण देशात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहेत. कॅटचे हे कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकल पण व्होकल आणि आत्मनिर्भर भारत या अभियानांना गावखेड्यात  बळकटी देणारे असतील. याशिवाय देशातील ७ कोटी व्यापारी कुठल्याही सरकारी मदतीविना आपत्कालीन परिस्तिथीत जनतेला सर्व सामान  उपलब्ध करून देत देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावत आहेत. कॅटला संलग्न असलेले ४० हजाराहून अधिक व्यापारी या अभियानात सहभागी होणार असल्याचे कॅटचे महाराष्ट्र उपाध्यक्ष आणि ठाणे जिल्हा होलसेल व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुरेशभाई ठक्कर यांनी सांगितले.
सुरेशभाई ठक्कर म्हणाले, २०२१ हे वर्ष भारतीय व्यापार सन्मान वर्ष म्हणून देशभरात उत्साहाने साजरे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात विविध कार्यक्रम निश्चित करण्यात आले आहेत. देशातील ई कॉमर्स व्यवसायाला परकीय कपन्यांच्या जाळ्यातून मुक्त करण्याबरोबर स्वदेशी मालाला रिटेल व्यवसायात अग्रणी ठेवण्यासाठी कॅट वर्षभर कार्यक्रम राबवणार आहे. त्याचबरोबर १० जून २०२० पासून सुरु केलेल्या चीनी मालावरील बहिष्कार अभियानातंर्गत यावर्षाच्या अखेर पर्यंत चीनमधून होणारी आयात  लाख कोटी रुपयांपर्यंत कमी करण्याचे कॅटचे लक्ष्य  पूर्ण होईल.याशिवाय राष्ट्रीय स्तरावरील ई कॉमर्स धोरण, केंद्र आणि राज्यपातळीवर व्यापारी कल्याण मंडळाची निर्मिती, वस्तूसेवा करात सुसूत्रता आणि त्याचे व्यापाऱ्यांवर असणारे ओझे कमी करणे, व्यापाऱ्यांसाठी आयकराचे टप्पे निश्चित करणे, देशातील सर्व जिल्ह्यामध्ये प्रशासकीय अधिकारी आणि व्यापाऱ्यांची एक संयुक्त समिती नेमणे, फूड सेफ्टी स्टँडर्ड कायद्याला खालच्या स्तरापर्यंत नेणे आदी महत्वाच्या विषयांना वाचा फोडून त्यावर निर्णय घेणास सरकारला भाग पाडले जाईल.
कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी सी भरतीया आणि सरचिटणीस प्रविण खंडेलवाल म्हणाले,आगामी वर्षभरात देशात अधिकाधिक महिलांना उद्योजक बनवण्याबरोबर ज्या महिला उद्योजक आधीपासूनच आहेत त्यांच्या व्यवसायांना आणखी बळकटी देण्यास कॅटची प्राथमिकता असणार आहे. महिला व्यवस्थापनात माहीर असतात हे त्यांनी याआधी अनेकदा सिद्ध केले आहे. त्यासाठी महिला उद्योजकांना डोळयांसमोर ठेवून महिला दिनी नारी तू परिपूर्ण आहेस, मातृदिनी आई तुझ्या पदराच्या छायेत, महिला उद्यमी राष्ट्रशक्ती आदी कार्यक्रमांचे आयोजन करणार आहे. देशातील महिला उद्योजकांना गौरविण्यात येईल. तर दुसरीकडे आपल्या हिमतीवर मोठा व्यवसाय निर्माण करणाऱ्या व्यापाऱ्यांना जीरो ते हिरो पुरस्कार, विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यापाऱ्याला भामाशाह  सन्मान, विविध राज्यात सर्वाधिक कर भरणाऱ्या व्यापाऱ्यांना अर्थव्यवस्थेचे रक्षक, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यापाऱ्यांना समाज नायक सन्मान अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल. यावर्षापासून व्यापाऱ्यांसाठी पेन्शन योजना, व्यापारी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना सवलतीच्या दरात विमा योजना, व्यापाऱ्यांना सुलभपणे कर्ज मिळावे म्हणून सरकारची मुद्रा योजनेचा देशाच्या कानाकोपऱ्यात प्रसार करणे, कमी व्याजदरात व्यापाऱ्यांना बँकांकडून आर्थिक सहाय्य मिळवून देणे आदी विषय प्रामुख्याने हाताळले जातील.

 461 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.