मागील एक महिन्यापासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा व्यापाऱ्यांना बसला फटका
मुंबई : दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरात मागील एक महिन्यापासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनामुळे दिल्लीसह जवळपास असलेल्या उत्तरप्रदेश, पंजाब, हरियाणा आणि राजस्थान मधील व्यापाऱ्यांचे आतापर्यत सुमारे २७ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. कॉंफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स(कॅट) आणि माल वाहतूकदारांची पालक संघटना असलेल्या ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट वेलफेअर संघटनेच्या संयुक्त प्रयत्नामुळे राजधानीत अत्यावक्षक वस्तुंचा पुरवठा सुरळीतपणे चालू आहे. दिल्लीकरांना जीवनाश्यक वस्तुंचा तुटवडा भासू नये म्हणून वाहतुकदारांना महामार्गाऐवजी लांब असलेल्या इतर पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत असल्याचे कॅटचे महाराष्ट्र उपाध्यक्ष आणि ठाणे जिल्हा होलसेल व्यापारी वेलफेअर संघाचे अध्यक्ष सुरेशभाई ठक्कर यांनी सांगितले.
सुरेशभाई ठक्कर म्हणाले दिल्लीत दिवसभरात वेगवेगळ्या राज्यातील ५० हजार ट्रक येतात. तर जवळपास ३० हजार ट्रक दिल्लीच्या बाहेर सामान नेत असतात. अजूनतरी दिल्लीत आवश्यक वस्तूंसह इतर सामानाची कमतरता जाणवलेली नाही. कॅट आणि देशातील वाहतूकदारांची पालक संघटना ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट वेल्फेअर असोसिएशन दिल्लीतील घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. केवळ दिल्लीत नाहीतर इतर राज्यातही मालाची कमतरता जाणवणार नाही यासाठी दोन्ही संघटना प्रयत्न करतआहेत . कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी सी भरतीया आणि सरचिटणीस प्रविण खंडेलवाल म्हणाले कृषी उत्पन्न बाजार समितीतील उत्पादने, दैनंदिन वापरातील वस्तू, खाद्यपदार्थ, फुले फळे, किराणा सामान, ड्रायफ्रूट, इलेक्ट्रॉनिक, विद्युत उपकरणे, सुटे भाग, औषधे, बांधकाम साहित्य, लोखंड, स्टील, कापड, लाकूड, प्लायवूड आदी सामान दिल्लीत रोज येत असते. हे सर्व सामान दिल्ली- जयपूर, दिल्ली- मथुरा, आग्रा एक्स्प्रेस वे, दिल्ली गजियाबाद हाय वे, दिल्ली- चंदिगढ हायवे आदी मार्गातून येत असते.सर्व राज्यांना दिल्लीशी जोडणारे मार्ग आहेत. पण या महामार्गावर आंदोलन सुरु असल्याने सर्व रस्ते जाम झाले आहेत. त्यामुळे लांबच्या रस्त्यांनी ट्रक येत असल्याने दिल्लीकरांना सामान उशिराने मिळत आहे. हे आंदोलन आणखी काही काळ वाढल्यास सामानाचा पुरवठा करण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात. पण कुठल्याही परिस्थितीत सामानाची उणिव जाणवू द्यायची नाही यासाठी पुरवठा सुरळीत कसा राहील यासाठी कॅट आणि एटवाचे प्रयत्न आहेत. दिल्ली हे औद्योगिक किंवा कृषी उत्पादक राज्य आहे. पण देशाच्या इतर भागातून याठिकाणी माल पाठवला जातो किंवा वेगवेगळ्या राज्यामध्ये पोहचवला जात असल्याने दिल्ली देशातील मोठे वितरण केंद्र आहे. दिल्लीत दररोज इतर राज्यातील सुमारे पाच लाख व्यापारी सामान खरेदी करण्यासाठी येत असतात. सद्यस्थितीत हा आकडा ना च्या बरोबर आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या नेत्यांशी चर्चा करुन कायमस्वरूपी तोडगा काढावा.
445 total views, 2 views today