शिवसेनेला विरोध करत औरंगाबादेतही काँग्रेसचा स्वबळाचा नारा

मतभेद झटकून सर्व ११५ जागा लढवण्याची तयारी करण्याचे प्रदेशाध्यक्ष थोरात यांचे निर्देश

मुंबई : औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने उतरत असून पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सर्व मतभेद संपवून जोमाने कामाला लागावे. पक्षहित हे सर्वात महत्वाचे आहे. कसल्याही प्रकारची गटबाजी खपवून घेतली जाणार नाही. औरंगाबादचा महापौर काँग्रेसचा होईल यासाठी कामाला लागा, पक्ष सर्वतोपरी मदत करेल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगत शहरातील ११५ जागा लढविण्याच्यादृष्टीने तयार राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
महापालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी थोरात औरंगाबाद येथे आले होते. यावेळी थोरात यांनी औरंगाबाद शहरातील प्रमुख नेते, पदाधिकारी यांच्याशी वैयक्तिक संवाद साधला व सध्याची राजकीय परिस्थिती व निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. त्यांनी सर्व नेत्यांना एकत्रित बसवून मार्गदर्शनही केले.
यावेळी बोलताना थोरात म्हणाले की, अमित देशमुख सारख्या तरुण व कर्तबगार मंत्र्याकडे औरंगाबादची जबाबदारी दिलेली आहे. प्रत्येक वार्डात काँग्रेसची ताकद वाढवा, लोकांपर्यंत पोहोचा. महानगरपालिकेच्या सर्व ११५ जागा लढवण्यासाठी तयार रहा. महाविकास आघाडी म्हणून पहिले ध्येय हे भाजपाला सत्तेपासून दूर ठेवणे हे आहे. निवडणुकीत आघाडीबाबत योग्य त्यावेळी निर्णय होईल. पण तुमची मते विचारात घेतली जातील. असे असले तरी सर्व जागा लढण्याची तयारी ठेवा आणि औरंगाबादला पुन्हा एकदा काँग्रेसचा गड बनवा.
ते पुढे म्हणाले की, काँग्रेस कमकुवत आहे असा अपप्रचार केला जात असून तो चुकीचा आहे. काँग्रेस पक्षाची ताकद असून त्याचा प्रत्यय नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत दिसून आलेला आहे. नागपूरचा ५५ वर्षांचा भाजपा आरएसएसचा बालेकिल्ला काँग्रेसने मोठ्या मताधिक्याने खेचून आणला, पुण्यातही विजय संपादन गेला. भाजपाचा या निवडणुकीत धुव्वा उडवला. काँग्रेस पक्षावर लोकांचा विश्वास आहे आणि महाविकास आघाडी सरकारच्या एका वर्षाच्या कामकाजावर लोक समाधानी आहेत, लोकांपर्यंत पोहोचा विजय निश्चित आहे असा कानमंत्र थोरात यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला.
औरंगाबादचे पालकमंत्री असल्यापासून थोरात यांचे या शहराशी वेगळे नाते आहे. त्यांचा काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी थेट संवाद आहे. शहराच्या राजकारणातील सर्व खाचखळगे त्यांना माहित आहेत. गांधी भवन येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ज्येष्ठ कार्यकर्ते चंद्रकांत पारखे डोळ्याची शस्त्रक्रिया झाल्याने उपस्थित नव्हते. त्यांची अनुपस्थिती थोरात यांच्या नजरेतून सुटली नाही व त्यांनी पारखे कुठे आहेत अशी विचारणा केली. अपंग सेलचे जिल्हाध्यक्ष मुद्दसर अन्सारी यांच्याबद्दलही त्यांनी विचारणा केली. छोट्या कार्यकर्त्यांबद्दलचे त्यांचे प्रेम पाहून उपस्थित सर्वांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला.
औरंगाबादच्या नामकरणास विरोधच – बाळासाहेब थोरात
शहराची नावं बदलून विकासाचे प्रश्न सुटत नाहीत. काँग्रेस पक्षाचा भर जनतेचे प्रश्न सोडवण्यावर, विकासाची काम करण्यावर आहे. औरंगाबादचे नाव बदलण्याचा विषय आमच्याकडे चर्चेसाठी आलेला नाही. ज्यावेळी समन्वय समितीमध्ये हा विषय चर्चेला येईल त्यावर काँग्रेस भूमिका मांडेल परंतु नाव बदलण्यास काँग्रेस पक्षाचा ठाम विरोध आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले.

 339 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.