फी सक्ती करणाऱ्या साकेत शाळा प्रशासना विरोधात मनसे आक्रमक

कोळसेवाडी पोलिसांनी मनसे, मनविसे पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेऊन सोडले

कल्याण : कोरोना काळात विद्यार्थ्याकडे फी भरण्यासाठी सक्ती करणाऱ्या कल्याण पूर्वेतील साकेत शाळा प्रशासनाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून शाळेत याबाबत आंदोलन करण्यात आले. शाळेत आंदोलन करणाऱ्या मनसे आणि मनविसेच्या कार्यकर्त्यांनी कोळसेवाडी पोलिसांनी ताब्यात घेत काही वेळानंतर सुटका केली.
कल्याण पूर्वेतील अनेक पालकांच्या तक्रारीनंतर आज कल्याण पूर्वेतील मनसे व मनविसे तर्फे साकेत शाळा प्रशासनाची कानउघडणी केली. कोरोना लॉकडाऊन असताना, तसेच अनेक पालकांकडे नोकरी नसताना वार्षिक शुल्क दरवाढ,पालकांच्या घरी जाऊन शुल्क वसुली, शुक्ल भरण्याची वारंवार सक्ती या व इतर अनेक  विषयावर मनसे आक्रमक होत साकेत शाळेत निदर्शने करत आंदोलन केले.  
शाळेचा वार्षिक शुल्क कमी करावी. येणाऱ्या वर्षा पासून डी. डी. देणार नाही. वार्षिक फी टप्प्या टप्प्याने भरण्याची मुभा मिळावी. दर महिन्याला पालक सभा घेण्यात यावी. शाळेत पिण्याच्या पाण्याची सोय चांगली असावी. शाळेतले अनेक वर्ग जे खराब झाले आहेत ते सुधारावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. मनसेच्या आक्रमकपणामुळे शाळा प्रशासनाने २ तारखेला मनसे पदाधिकारी,पालक,शाळा प्रशासन यांची एकत्रित  बैठक बोलावली असून या बैठकीत पालकांच्या सर्व मागण्यांचा विचार केला जाईल असे सांगण्यात आले.
या वेळी मनविसे शहर अध्यक्ष निर्मल निगडे, मनविसे उपशहर अध्यक्ष अंकुश राजपूत, सतीश उगले, मनसे उप विभाग अध्यक्ष गंगाधर कदम, उपशाखा अध्यक्ष रमेश शिंदे यांना कोळसेवाडी पोलिसांनी ताब्यात घेत नंतर सुटका केली. या आंदोलनात मोठ्या संख्येने पालक आणि मनसे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

 547 total views,  3 views today

Leave a Reply

Your email address will not be published.