२०० शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरुन जमीन मोजणी करण्यास केला विरोध
ठाणे : स्थानिक भूमिपुत्रांकडून पूर्वापार कसत असलेली सुमारे २२ एकर शेतजमिनी लाटण्याचा प्रयत्न विजय ग्रुप या कंपनीने पोलिसांच्या मदतीने सुरु केला आहे. आज या कंपनीने पोलिसांना चक्क खासगी वाहनांमधून शेतजमिनीवर आणून सर्व्हे करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या भागातील शेतकरी आक्रमक झाल्याने परिसरात काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. तर, या प्रकरणात पोलिसांची भूमिका ही बिल्डरधार्जिणी असल्याचा आरोप स्थानिक भूमिपुत्रांनी केला आहे.
घोडबंदर पट्ट्यामध्ये ठाण्यातील कासारवडवली येथील कावेसर वाघबिल जुना गावात सुमारे २२ एकरचा भूखंड आहे. या भूखंडाचे औद्योगिकीकरणासाठी १५ वर्षांपूर्वी अधिग्रहण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
मात्र, शेतकर्यांना जमिनीचा पूर्ण मोबदला दिल्याशिवाय जमिनीचे अधिग्रहण करण्यात येऊ नये, असे निर्देश त्यावेळी देण्यात आले होते. परंतु, सदर कंपनीने शेतकर्यांचा मोबदलाच दिला नसल्याने तसेच सदर शेतजमिनीकडे सदर कंपनी फिरकलीही नसल्याने मूळ मालक असलेल्या ४० भूमिपुत्र शेतकर्यांनी आपल्या जमिनी कसण्यास सुरुवात केली होती. गेली १५ वर्षे हे शेतकरी येथे भातशेती करीत आहेत. असे असतानाच विजय ग्रुप या विकासकाने विकास करारनामा करुन शेतकर्यांना मोबदला न देताच ही जमिन ताब्यात घेण्याचा डाव आखला आहे. मंगळवारी बिल्डरने आपल्या वाहनांमधून पोलिसांना सदर भूखंडावर आणून जबरदस्तीने शासकीय सर्व्हे करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संतप्त झालेल्या २०० शेतकर्यांनी स्थानिक नगरसेवक नरेश मणेरा, नगरसेविका नम्रता रवि घरत, समाजसेवक रवि घरत यांच्यासह घटनास्थळ गाठून सदरचा सर्व्हे उधळून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, बिलड्रने पोलीस बळाचा वापर करुन शेतकर्यांचे हे बंड मोडीत काढण्याचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान, या ठिकाणी शेतकर्यांना त्यांचा मोबदला न देताच बिल्डरच्या इशार्यावर आलेले पोलीस शेतकर्यांवरच अन्याय करीत असल्याने कावेसर गावामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. जर, पोलिसांनी बिल्डरच्या बाजूने मैदानात उतरण्याचा प्रयत्न केला तर शेतकरीही रस्त्यावर उतरतील, असा इशारा यावेळी भूमिपुत्रांनी दिला आहे.
610 total views, 1 views today