कचोरे येथील वन जमिनीवरील अनधिकृत घरांवर पालिकेने उचलला होता कारवाईचा बडगा
कल्याण : कल्याण तालुका वन विभागाच्या कचोरे येथील वन संरक्षण जमिनीवर असलेल्या बेकायदेशीर घरांवर गुरूवारी वन विभागाने मोठ्या बंदोबस्तात कारवाई सुरु करताच भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली. कारवाईच्या विरोधात प्रचंड संताप व्यक्त केला व सरकार कोरोना काळात गरीबांच्या घरावर हातोडा चालविते अशी टिका करत आधी पुनर्वसन करा मग विस्थापित करा अशी मागणी करत कारवाईस विरोध केला. माजी मंत्री व आमदार यांनी वनमंत्र्याशी संपर्क साधून मध्यस्थी केल्याने अखेरिस दुपारी ही कारवाई वन विभागाने तूर्तास थांबविली.
कल्याण पूर्वेकडील कचोरे येथे वन विभागाच्या जागेवर सुमारे वीस पंचवीस वर्षापासून साडे तीनशे हुन अधिक बेकायदा अनधिकृत घरे वसली आहेत. गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास वनविभागाच्या पथकाने पोलीस बंदोबस्तात या घरांवर कारवाई सुरू केली. या कारवाईमुळे येथील रहिवाशांची अक्षरशः तारांबळ उडाली. घरातील सामान हलवायचे कुठे असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला होता. दुपार पर्यंत वनविभागाने १५० हुन अधिक घरे जमीन दोस्त केली. वनविभागाने कोणतीही नोटीस न देता थेट कारवाई केल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. नागरिकांचा वाढता विरोध लक्षात घेता या ठिकाणी आमदार रवींद्र चव्हाण यांच्यासह स्थानिक नगरसेवकानी धाव घेत या कारवाईस विरोध केला.
भाजप आमदार चव्हाण यांनी अधिकाऱ्यांवर आगपाखड करत कारवाई थांबवण्याची मागणी केली. कोरोना काळात लोकांना रोजगार नाही अशा परिस्थितीत या घरांमध्ये राहणारे लोक कुठे जाणार असा संतप्त सवाल उपस्थित केला. माजी मंत्री व आमदार यांनी वनमंत्र्याशी संपर्क साधून मध्यस्थी केल्याने अखेरिस दुपारी ही कारवाई वन विभागाने तूर्तास थांबविली.
460 total views, 1 views today