महिला सुरक्षेबाबत शिवसेना महिला आघाडी आक्रमक

पालिका आयुक्तांची घेतली भेट

कल्याण : काही दिवसांपूर्वी कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात स्कायवॉकवर तरुणीच्या छेडछाडीच्या प्रकारानंतर महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नांबाबत शिवसेना महिला आघाडी आक्रमक झाली असून शिवसेना कल्याण जिल्हा संघटक विजया पोटे यांच्या नेत्तृत्वाखाली याबाबत पालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे इतर विषयांवर देखील चर्चा करण्यात आली.
कल्याणच्या स्कायवॉकवरील गर्दुल्ले, चोरटे, भिकारी यांच्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यावर उपाययोजना झाल्या पाहिजे. तसेच याच परिसरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांचा देखील वावर वाढत चालला आहे. त्यामुळे महिलांचे त्या मार्गातून जाणे येणे कठीण झाले आहे. त्यामुळे लवकरात लवकर महिलांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक, सीसीटीवी कॅमेरा सारखे उपाय केले गेले पाहिजे.
त्याचप्रमाणे मनपाच्या ताब्यात असलेल्या आणि विकासकांनी आरक्षणांतर्गत बांधून दिलेल्या फिश मार्केट, मिनी मार्केट मध्ये महिला बचत गटांसाठी महिला सक्षमीकरणाच्या अंतर्गत प्राधान्य देण्यासाठी गाळे व ओटे माफक दरात भाडेतत्त्वावर मिळावेत. ज्यामुळे त्यांना रोजगार मिळेल आणि पालिकेला देखील उत्पन्न सुरू होऊ शकेल. तसेच गौरी पाडा येथील मनपा आरक्षित भूखंडावर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पाच कोटी रुपये निधीतून मागासवर्गीय गुणवंत मुले व मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहाच काम हे अंतिम टप्यात आहे. ते गरजवंत मागासवर्गीय मुला मुलींसाठी लवकर उपलब्ध करून द्यावे आदी मागण्या करण्यात आल्या.
या मागण्या लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना महिला आघाडीने दिला असून आयुक्तांकडून देखील सकारात्मक उत्तर मिळाले असल्याचे शिवसेना कल्याण जिल्हा संघटक विजया पोटे यांनी सांगितले. यावेळी माजी नगरसेविका सुशीला माली, छाया वाघमारे, शीतल मंढारी तसेच कल्पना कपोते, आशा रसाळ, विद्या चौधरी, नेहा नरे, नमिता सावंत आणि शिवसेना कल्याण महानगर प्रमुख विजय साळवी देखील उपस्थित होते…

 545 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.