पदपथांवरील अतिक्रमणांविरुध्द कडक कारवाई करणार

पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचा इशारा

कल्याण : महापालिकेच्या नागरिकांना रस्त्यांवरुन व पदपथांवरुन कुठल्याही खोळंब्याशिवाय सहज चालता यावे यासाठी महापालिकेने यापुर्वीच पदपथांवरिल फेरीवाल्यांविरुध्द कारवाई सुरु केलेली आहे, त्याचप्रमाणे रस्त्यालगतची भंगार बेवारस वाहने उचलण्याबाबतही महापालिकेने मोठी मोहिम सुरु केली आहे. त्यामुळे आता पदपथांवर अतिक्रमण करणा-या दुकानदारांवर कडक कारवाई करणार असल्याची माहिती पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज वाहतूक पोलिस, स्थानिक पोलिस अधिकारी, वास्तुविशारद संघटनेचे पदाधिकारी व महापालिका अधिकारी, एम.सी.एच.आय. पदाधिकारी यांचे समवेत संपन्न झालेल्या मोबिलीटी कमिटीच्या बैठकीत दिली.
या बैठकीत वाहतूक विभागाचे उप आयुक्त यांनी महापालिका परिसरात कुठे साईन बोर्ड लावावेत, पार्कींगची व्यवस्था कशी असावी याबाबत उपयुक्त सुचना केल्या. त्यानुसार महापालिका लवकरच साईन बोर्ड लावण्याची व्यवस्था करणार आहे, पार्कींगसाठी महापालिकेच्या ताब्यात असलेल्या जागांचा वापर कशाप्रकारे करता येईल याबाबत विचार केला जाईल, तसेच पी-१, पी-२ च्या पार्कींग व्यवस्था करण्यासाठी दुभाजक काढणेबाबत वाहतूक विभागाकडून प्राप्त सूचनांचा विचार केला जाईल असे पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.
 वाहन तळावर जमा केलेल्या बेवारस वाहनांचे ई ऑक्‍शन करणे, रिफ्लेक्टेड जॅकेट वाहतूक पोलिसांना पुरविणे, चुकीच्या ठिकाणी पार्कींग केलेल्या गाडयांना जॅमर लावणे, अनावश्यक ठिकाणी असणारे दुभाजक काढणे, त्याचप्रमाणे काही रस्ते केवळ पादचा-यांना चालण्यासाठी मोकळे ठेवणे इ. विषयांवर या बैठकीत चर्चा झाली. महापालिकेने ७ ठिकाणी सिग्नल यंत्रणा उभी केली असून ते सिग्नल तोडल्यास संबंधितांना ई-चलान देण्याची व्यवस्था १५ दिवसांत करण्याचा प्रयत्न असल्याबाबतची माहिती पालिका आयुक्तांनी यावेळी दिली.
या बैठकीस अति. आयुक्त सुनिल पवार, शहर अभियंता सपना कोळी (देवनपल्ली), वाहतूक पोलिस उपआयुक्त बाळासाहेब पाटील, सहा.आयुक्त पोलिस अनिल पोवार, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील, ‍ अन्य पोलिस अधिकारी, महापालिका अधिकारी, आरटीओचे प्रतिनिधी, वास्तुविशारद संघटनेचे पदाधिकारी, एम.सी.एच.आय. संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

 506 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.